सातारा : निसर्ग संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या प्रा. संध्या चौगुले यांनी संरक्षित केलेल्या हिरवाईत चोरी झाल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी वॉचमनच्या खोलीतील संसारोपयोगी वस्तूंसह मुलांची खेळणी, साऊंड सिस्टीम, खुर्ची, टेबल चोरून नेले आहे. मात्र, कपाटात असलेल्या एकाही पुस्तकाला चोरट्यांनी हात न लावल्याने लाखो रुपयांची पुस्तके मात्र सुरक्षित राहिली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, हिरवाईतले वॉचमन रुक्मदीन शेख, बेगम शेख हे दोघे नवरा-बायको आजारी असल्यामुळे गेले दोन महिने गावाकडे आहेत. सध्या तेथे वॉचमन नसल्यामुळे प्रा. चौगुले दर चार दिवसांनी हिरवाईत जाऊन सर्व जिथल्या तिथे आहे का हे पाहत होत्या. दरम्यान, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास त्या हिरवाईत गेल्या तर त्यांना वॉचमनच्या खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. खोलीतील सर्व अंथरूण, पांघरूणासह सर्व भांडी चोरीला गेली आहेत. कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजारांचे सामान चोरीला गेले आहे.
दरम्यान, हिरवाईत असलेल्या लायब्ररीतील कपाट पाहिल्यानंतर त्यातील एकाही पुस्तकाला चोरट्यांनी हात लावलेला नाही. विविध संस्था आणि व्यक्तींनी लाखो रुपयांचे दिलेले शब्दधन आहे त्याच परिस्थितीत तेथे पडून आहे; पण संसारिक वापराच्या आणि समाजातील विविध स्तरांतून दान स्वरूपात आलेल्या वस्तू मात्र चोरीला गेल्या आहेत.
या वस्तूंची झाली चोरी
दोन वर्षांपूर्वी आपल्या हक्काच्या असाव्यात म्हणून खरेदी केलेल्या तीन डझन खुर्च्या, आधीच्या काही खुर्च्या, ५ टेबल्स, मोठ्या छत्र्या, मुलांची खेळणी, बक्षिसांसाठी आणलेल्या वस्तूंचे बॉक्स, चटया, सतरंज्या, कार्यक्रमांसाठीचे डेकोरेशन मटेरियल सर्व काही चोरीस गेले आहे. झाडांना पाणी घालण्याची पाईपही चोरीला गेली आहे. याशिवाय अंडरग्राउंड पाण्याची पाईपलाईन केली होती तीही उपसून टाकून पीयूसी पाईपलाईनसह छोटे साऊंड सिस्टीम चोरीला गेले आहेत.
कोट
हिरवाईतील शैक्षणिक वस्तूंचा साठा जवळजवळ संपूनच गेला आहे. आता नव्याने पुन्हा जुळवाजुळव करावी लागणार. खूप काटकसरीने संसार करत यातील एकेक वस्तू जमविलेली होती. हे लोक दूरचे कोणी नसणार, जवळच्यांनी असा घात का केला हा प्रश्नच आहे.
- प्रा. संध्या चौगुले, हिरवाई, सातारा