सातारा : जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदांसाठी मंगळवारी निवडी झाल्या. यामध्ये सर्वच पंचायत समितीत राष्ट्रवादीचे सभापती झाले आहेत, तर खंडाळ्याच्या उपसभापतिपदी काँग्रेस तर कऱ्हाडच्या उपसभापतिपदी कऱ्हाड विकास आघाडीचा सदस्य विराजमान झाला. उर्वरित सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचाच गजर झाला आहे.जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदांच्या निवडीसाठी मंगळवारी संबंधित पंचायत समितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये आपापल्या गटातील सदस्यांना या खुर्चीवर बसविण्यासाठी राष्ट्रवादीतील नेते पुढे सरसावले होते. गेल्या काही दिवसांपासून बैठकांवर भर दिला जात होता. त्याला मंगळवारी यश आले. खंडाळा आणि कऱ्हाडच्या उपसभापतींचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी सभापती व उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले. सातारा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम व जितेंद्र सावंत यांनी सातारा विकास आघाडीच्या खासदार गटाच्या उमेदवारांचा दोन मतांनी पराभव केला. सभापतिपदी कदम, तर उपसभापतिपदी सावंत यांची निवड झाली. खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे मकरंद ऊर्फ मारुती मोटे सभापती, तर काँग्रेसच्या वंदना अविनाश धायगुडे या उपसभापती झाल्या. फलटण पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या रेश्मा भोसले सभापती, तर शिवरुपराजे खर्डेकर हे उपसभापतिपदी निवडून आले. वाईतून राष्ट्रवादीच्याच रजनी भोसले यांना सभापती व अनिल जगताप यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली. महाबळेश्वरला राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे सभापती, अंजना कदम या उपसभापतिपदी विजयी झाल्या.जावळीतून राष्ट्रवादीच्या अरुणा शिर्के, दत्तात्रय गावडे, कोरेगावमधून शंकर ऊर्फ राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, माणमधून रमेश पाटोळे, नितीन राजगे यांची अनुक्रमे सभापती, उपसभापतिपदी वर्णी लागली. खटावमधून राष्ट्रवादीचे संदीप मांडवे, कैलास घाडगे, तर पाटणमधून उज्ज्वला जाधव, राजाराम शेलार हे सभापती, उपसभापतिपदी विराजमान झाले. कऱ्हाडला राष्ट्रवादी-कऱ्हाड विकास आघाडी एकत्रकऱ्हाड : येथील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी ‘हम सात-सात है’ म्हणत गळ्यात गळे घातल्याने राष्ट्रवादीच्या शालन माळी यांची सभापतिपदी, तर उंडाळकरांच्या तालुका विकास आघाडीचे रमेश देशमुख यांची उपसभापतिपदी निवड झाली.
सातारा जिल्ह्यात सबकुछ राष्ट्रवादी!
By admin | Published: March 14, 2017 11:01 PM