कऱ्हाड : विद्यानगर येथे रविवारी रात्री गस्त घालत असणाऱ्या पोलिसांवर आठ ते दहा युवकांनी हल्ला केला. यावेळी युवकांनी केलेली धक्काबुक्की व मारहाणीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह एक कर्मचारी जखमी झाला. उंडाळकर होस्टेलनजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी सात युवकांना अटक केली आहे. अख्तर बालेखान आत्तार (वय २८), रिझा हरुण नाईक (२४), शाहरुख रहिमतुल्ला मुजावर (२३), मोहसीन फकीर शेख (२५), अभिजित सीताराम मोरे (२८), सौरभ सुरेश पाटील (२३), शिवराज बाबूराव विभूते (२८, सर्व रा. बनवडी-कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सर्जेराव पवार यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत प्रचाराची मुदत होती. प्रचार संपल्यानंतर शहरासह तालुक्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी रात्री शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील हे कर्मचारी बाजीराव पवार यांच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांसोबत शासकीय जीपमधून रात्रीची गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्वजण विद्यानगर येथील उंडाळकर होस्टेल परिसरात पोहोचले. त्यावेळी तेथे युवकांची वादावादी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या निदर्शनास आले. भांडणे सुरू असल्याचे दिसताच पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव पवार त्याठिकाणी गेले. त्यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भांडणे करणाऱ्या युवकांनी कॉन्स्टेबल पवार यांनाच घेरून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी निरीक्षक पाटील यांनी जीपमधून उतरून त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी युवकांना शांत राहण्याचे आवाहन करीत कॉन्स्टेबल पवार यांना जमावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी जमावाने निरीक्षक पाटील यांच्यासह कॉन्स्टेबल पवार यांना धक्काबुक्की केली. अख्तर आत्तार या युवकाने निरीक्षक पाटील यांच्या चष्म्यावर मारहाण केली. त्यामुळे चष्मा फुटून निरीक्षक पाटील यांच्या भुवईला गंभीर दुखापत झाली. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित युवकांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. शासकीय कामात अडथळा तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)+भांडणे सोडविताना घडली घटनापोलीस निरीक्षकांसह कर्मचारी जखमीयुवकांकडून जोरदार धक्काबुक्की
सर्वपक्षीय बैठक निष्फळ
By admin | Published: August 03, 2015 11:16 PM