रहिमतपूर : ‘अंभेरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे’, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी दिले.
अंभेरी (ता. कोरेगाव) येथे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या फंडातून पूर्ण झालेल्या सभामंडपाचे उद्घाटन तसेच पंचायत समितीच्या शेष फंडांमधून बंदिस्त गटार योजनेचे भूमिपूजन भीमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य शुभांगी काकडे, नामदेव निकम, वसंतराव निकम, भरत निकम, सरपंच विष्णू गायकवाड, विजयराव निकम, मोहनराव निकम, शंकर जाबर, उमेश भोसले, मनोज निकम, हनुमान निकम, सुहास निकम उपस्थित होते.
भीमराव पाटील म्हणाले, ‘वाठार किरोली जिल्हा परिषद गटातील कुठल्याही गावात विकासकामे करताना कधीही राजकीय गटतट बघत नाही. ग्रामस्थांची गैरसोय दूर करून सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर भर देतो. राजकारणात उतरल्यापासून समाजकारणाला प्राधान्य देत आलो असून, कायम हाच अजेंडा ठेवणार आहे. गावाच्या विकासासाठी लोकांनी एकत्रित येऊन विकासाला प्राधान्य द्यावे.’