पळशी : माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव यात्रा व कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शिंगणापूरमध्ये येणारे सर्व मार्ग मंगळवारी सील करण्यात आले.
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर विश्रामग्रह येथे पोलीस प्रशासन व मंदिरातील पुजारी, मानकरी यांच्यात मंगळवार,दि. २० रोज रोजी बैठक पार पडली. बैठकीस प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, मंदिर व्यवस्थापक ओंकार देशपांडे, उपसरपंच शशिकांत भोसले, विजयकुमार कावडे प्रभाकर माने, माजी सरपंच राजाराम बोराटे आदी उपस्थित होते.
शिंगणापूरमध्ये येणारे सर्व मार्ग सील करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुढी परंपरेनुसार शिंगणापूरमध्ये कावड, काठ्या आणण्यास बंदी घालण्यात आली असून, मराठवाडा विदर्भ व इतर राज्यातून भाविकांनी येऊ नये, असे आवाहन बैठकीत करण्यात आले..
गर्दी टाळण्यासाठी यात्रा कालावधीत सर्व शिंगणापूरनगरीवर ड्रोन कॅमेराची करडी नजर ठेवण्यात येणार असून, मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
या बंदोबस्तासाठी एक विभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस अधिकारी, सत्तर पोलीस कर्मचारी तसेच तीन दंगा नियंत्रणक पथक तैनात केले जाणार आहे. यात्रा कालावधीत प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.