संस्थेचे सभासद व पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव संकपाळ, उपसरपंच संजय सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रल्हाद सूर्यवंशी, सोसायटीचे माजी सदस्य रामचंद्र पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष हणुमंत पाटील, सदाशिव पवार, श्रीमंत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी माहिती देताना शिवाजीराव जगदाळे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत विकास सेवा सोसायटीचे २३ नंबरचे एक खाते आहे. ते खाते आजआखेर संस्थेच्या रेकॉर्डवर ताळेबंदात कुठेही दिसत नाही. मात्र, त्या खात्यावर पैसे टाकले जातात. आणि त्यातून पैसे काढलेही जात असल्याचे दिसून येत आहे. २०१५ साली या खात्यातून तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पैसे काढल्याचे कागदोपत्री दिसत आहे. गत काही वर्षापासून संस्थेत चाललेल्या अनागोंदी कारभारामुळे येथील सभासदांनी संस्थेची खातेनिहाय चौकशी व तपासणी व्हावी, अशी मागणी सहकार निबंधकाकडे केली होती. त्यानंतर ही बाब पुढे आली आहे.
हेळगाव येथून जवळच असलेल्या खराडे गावातील स्वस्त धान्य दुकान काही कारणाने बंद झाले होते. ते सुरू करण्यासाठी हेळगाव सोसायटीने पुरवठा शाखेकडे मागणी केली होती. त्यानुसार हेळगाव सोसायटीला चालवण्यास परवानगी मिळाली. मात्र ते चालविण्यासाठी सध्याच्या सोसायटीच्या विद्यमान अध्यक्षांना संपूर्ण जबाबदारी देण्यात यावी, असा ठराव सोसायटीत करून घेण्यात आला आहे. त्यानुसार ते स्वत:चे भांडवल वापरून सदरचे दुकान चालवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. सध्या काही संचालकांच्या नावे गायी, म्हशीची प्रकरणे केली आहेत. मात्र, गायी व म्हशी कागदोपत्री घेतल्या आहेत. प्रत्यक्षात नाहीत. या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.