तरडगाव : ‘पाडेगाव येथे कोरोना लसीकरण नियमबाह्य पद्धतीने होत असल्याबाबतचे निवेदन फलटण तालुका भाजपाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. यापूर्वीही लसीकरणामध्ये असे घडलेले प्रकार निदर्शनास आणून दिले आहेत. याचा राग मनात धरून सरपंच अपयश व जबाबदारी लपवण्यासाठी प्रसिद्धी पत्रकातून तर्कहीन व बिनबुडाचे आरोप करीत आहेत,’ असा टोला किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव दडस यांनी लगावला आहे.
दडस यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘गावच्या हिताच्या दृष्टीने मी लोकांच्या तक्रारी प्रशासनदरबारी अनेक वर्षे मांडत आहे. मी ज्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्याबाबत प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. त्यामध्ये भारत निर्माण योजना, नेवसेवस्ती शाळा दुरुस्ती प्रकरण व पुनर्बांधणी काम प्रकरण, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पंचायत समिती व जिल्हा परिषद फंडातील गावातील रस्ते, नियमबाह्य ग्रामसभा अशा प्रकारच्या सार्वजनिक कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार उघड करण्याचे काम विरोधी पक्ष नेता म्हणून करत आहे.
जवळपास चार-पाच वर्षांतील ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामातील निकृष्ट दर्जा, कामांमध्ये अनियमितता तसेच ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी पाहता गावच्या सरपंच यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचे कसलेच योगदान किंवा जबाबदारी घेतलेली दिसून येत नाही. त्यांनी नैतिकतेचे भान ठेवून तत्काळ राजीनामा द्यावा, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.