खंडाळा : कंपनीत कामाला घ्यावे, यासाठी चर्चेतून मार्ग काढला असताना ठेकेदारांनी पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासून कामगारांचे हाल सुरूच ठेवल्याने कामगार महिलांनी कंपनी गेटवरच ठिय्या मांडला. व्यवस्थापनाने दखल घेतली नसल्याने रात्रभर महिलांना ताटकळत बसावे लागले. ढिसाळ व्यवस्थापनामुळे महिलांवर अशी वेळ आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
धावडवाडी, ता. खंडाळा येथील हायटेक प्लास्ट कार्पोरेशन कंपनी व्यवस्थापनाकडून कंपनी कामगारांना कायद्यानुसार सुविधा पुरविल्या जात नाहीत. तसेच गेल्या पाच वर्षांपासून कंपनीत काम करीत असतानाही कंत्राटी कामगार म्हणून काम करून घेतले जात आहे, असा आरोप करत कामगारांनी खंडाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. हा प्रश्न अधिकच चिघळला जाऊ लागल्याने यामध्ये आमदार मकरंद पाटील यांनी लक्ष घालून कामगार व कंपनी प्रशासन यांच्यात समेट घडवून आणला.याबाबत चर्चा होऊन कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देणे मान्य करण्यात आले होते.
कंपनीने कामगारांचा ठेका अन्य एका कंपनीला दिल्याने कायद्यानुसार कामगारांना आठ तास व बारा तास कामाप्रमाणे वेतन देणे तसेच कामगारांना भविष्य निर्वाह निधी देण्याचे मान्य केले. उपोषण करणाºया ४२ कामगारांना टप्प्याटप्प्याने कामात सामावून घेण्यात येणार असून, कंपनी प्रशासनाने सर्व सुविधा पुरविण्याचे निश्चित केले होते. मात्र, त्याप्रमाणे कार्यवाही न करता कामगारांना घरचा रस्ता दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिनाभर लढा देऊनही उपासमारीची वेळ आली. या महिलांनी आता गेटसमोर धरणे धरले आहे. रात्रभर महिलांना ताटकळत बसावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. भर पावसात रात्र जागून काढली तरी कंपनीला घाम फुटला नाही, त्यामुळे मागे न हटण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.