चाफळ : निसरे येथील युवराज सिन्नाप्पा चव्हाण यांनी मल्हारपेठ येथील दत्तकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून कर्ज उचल घेतलेली आहे. कर्ज थकीत गेल्याने पतसंस्थेच्या वसुली व विक्री अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची तारण मालमत्ता लिलाव करून विक्री केलेली आहे. कारवाईत अडथळा आणण्यासाठी कर्जदार व त्यांची पत्नी वरिष्ठांना निवेदने देऊन दिशाभूल करीत आहेत. पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची चौकशी केली असता ती योग्य असल्याचे मत पाटणचे सहायक निबंधकांनी वरिष्ठांना पाठविलेल्या चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे.
अहवालात म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या पत्नी मनीषा युवराज चव्हाण या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आहेत. त्या त्यांच्या लेटर पँडचा वापर करून इतर विविध कार्यालयांकडे तक्रार अर्ज दाखल करीत आहेत. यापूर्वीचे त्यांचे अर्ज विहित वेळेत निकाली काढलेले आहेत. तक्रारदार कर्जाची व व्याजाची रक्कम संस्थेस देण्यास टाळाटाळ करण्यासाठी सतत तक्रार अर्ज देत आहेत. कर्ज भरण्याचे टाळण्यासाठी मदत करीत नसल्यामुळे व त्यांना कर्ज माफ करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने मदत करीत नसल्याने ते तक्रारी करीत आहेत. पतसंस्थेने कोणताही अपहार केला नसून तक्रारदार शासकीय अधिकाऱ्यांची बदनामी करीत आहे. तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याने हा अर्ज निकाली काढल्याचे शेवटी म्हटले आहे.