सातारा : संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याने भारतीय जनता पक्षातर्फे साताऱ्यातील पोवई नाका परिसरात नागरिकांना पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.संसदेत सादर करण्यात आलेले नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले होते. संविधानाच्या विरोधात असणारे हे नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्यात यावे, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या आंदोलनाच्या दुसºयाच दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाले, तरीही देशाबाहेर शरणार्थी म्हणून राहणा-या मुस्लिमेतर मूळ भारतीय असणारी मंडळी यांना आता भारतीय नागरिकत्व मिळण्यास कायदा मदत करेल. कोट्यवधी शरणार्थी याचा लाभ घेतील.’कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर म्हणाले, ‘विरोधक हे बिल मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या विरोधात असल्याचे सांगतात; परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहाने आवश्यक दुरुस्त्या मान्य करून बहुमताने हा कायदा केला.’
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर, शहर सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, राहुल शिनगारे, चंदन घोडके, नीलेश शहा, विक्रांत भोसले, डॉ. अजय साठे, डॉ. रेपाळ, राहुल शिवनामे, अमोल सणस, विक्रम बोराटे, नितीन बर्गे उपस्थित होते. पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटप केले.