सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ कार्यवाही केली. फिरता शिक्षक (मोबाईल टिचर) भरतीसाठी परवानगी द्यावे, असे स्मरणपत्र त्यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांना पाठविले आहे.
‘लोकमत’ ने मागील आठवड्यात ‘दिव्यांगांच्या शिक्षणाचा जिल्ह्यात खेळखंडोबा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्तामध्ये दिव्यांग मुलांच्या शिक्षणावरच गदा आणण्याचा छुपा डाव खेळला गेला असून या मुलांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचे दुष्परिणाम आगामी काळात भयावह समस्या घेऊन पुढे येण्याची दाट शक्यता आहे.
विशेष शाळा वगळता जिल्ह्यातील तब्बल ७ हजार विशेष विद्यार्थी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांना पुरेसे शिक्षकच उपलब्ध नाहीत. १0 विद्यार्थ्यांमागे १ विशेष शिक्षक नेमायला हवा, असा सर्व शिक्षा अभियानातील निकष आहे. साहजिकच ७ हजार ९१९ विद्यार्थ्यांसाठी किमान ७00 शिक्षकांची भरती होणे अपेक्षित आहेत; परंतु आपल्या सातारा जिल्ह्याला एमपीएसपी (ंमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद) यांनी केवळ ६३ शिक्षकांनाच परवानगी दिली आहे. सध्याच्या घडीला केवळ ६0 शिक्षक कार्यरत आहेत.
२0१२ मध्ये विशेष शिक्षकांची ‘मोबाईल टिचर’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडत गेली असली तरी ‘राईट टू एज्युकेशन’ हे ब्रिद मिरविणाºया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने मोबाईल टिचर भरतीला परवानगीच दिली नसल्याने विशेष मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पुरसे शिक्षक नसल्याने या मुलांच्या शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतला गेल्याचे सध्या समोर येत आहे. याबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला स्मरणपत्र धाडले.
काय आहे पत्रात उल्लेख?
सातारा जिल्हा अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये एकूण केंद्रांची संख्या २३२ इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ९१९ आहे. केंद्राची व दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या पाहता फिरता शिक्षक फक्त ६0 इतकी आहे. लाभार्थ्यांना शैक्षणिक सहायभूत सेवा, संदर्भ सेवा व गुणवत्तेच्या दृष्टिने फिरता विशेष शिक्षकांची संख्या फारच कमी आहे.
तालुक्यातील केंद्रांच्या संख्येनुसार फिरता विशेष शिक्षक उपलब्ध झाल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन शैलीची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नियमीत प्रवाहात समावेशित करण्यासाठी त्याच्या मार्फत येणाºया समस्येवर उपाययोजना करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यभूत सेवा उपलब्ध करुन देऊन शाळेत टिकवून ठेवण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यासाठी प्रत्येक तालुक्यातील केंद्र संख्येनुसार फिरता विशेष शिक्षक मिळावा अथवा खास बाब म्हणून विशेष शिक्षक भरती करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी, असे डॉ. राजेश देशमुख यांनी या स्मरणपत्रात म्हटले आहे.