पेट्री/सातारा : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यवृष्टी, दाट धुके, अति थंडीमुळे घरातील उबदार वातावरणासाठी जुन्या, पारंपरिक पद्धतीने कोळंब गवताच्या झडपा बांधून पर्यावरणपूरक उपाययोजना सुरू आहे.डोंगरमाथ्यावरील अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतीकामास बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगड्यांच्या तुडुसाचा वापर करतात. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी जुन्या, पारंपरिक कोळंब गवताच्या झडपी बांधल्या जातात. सद्य:स्थितीत बहुतांश जणांनी झडपा बांधून घरांच्या भिंतींना संरक्षणात्मक उपाययोजना केली असून, काही ठिकाणी झडपा बांधण्याचे काम सुरू आहे.मुसळधार पावसाचा तडाखा ज्या दिशेने बसतो. अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधली जातात. मे अखेरीस अथवा जूनच्या सुरुवातीस कामाला सुरुवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभारून मेसाची फोकाटी आडवी, उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवत अशा विशिष्ट पद्धतीने ही झडपी बांधली जातात.
पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधतात. पावसाळ्यानंतर कुजलेले गवत तरव्याला वापरून खतासाठी वापरतात.चौकटआखाडेमुरा, ता. जावलीकास पठारावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यापासून घराचे संरक्षण करण्यासाठी डोंगरमाथ्यावर घराच्या भिंतींना झडपी बांधण्यास वेग आला आहे.