पिंपोडे बुद्रुक : माॅन्सूनपूर्व पावसाच्या जोरावर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात खरिपातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन पिकांची पेरण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. आगाप पेरणी केलेला घेवडा चांगला आलेला आहे. मात्र कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन. या काहूराच्या चिंतेत असणारा बळीराजा मात्र पेरणीनंतर आत्ता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
दोन वर्षांमध्ये भागांतील पाण्याची पातळी समांतर आहे. एप्रिल, मे महिन्यात झालेल्या उन्हाळी पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या जोरावर चार पाच दिवसांपासून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक शिवारात छोट्या ट्रॅक्टर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पेरणीची भिरकिट सुरू आहे. वरुण जातीचा घेवडा, वाटाणा आणि सोयाबीन या पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी अपेक्षित असणारी दर्जेदार रासायनिक खतांचा अभाव जाणवत होता. मिळेल त्या कंपनीचे रासायनिक खते घेऊन पेरणी उरकण्याच्या धांदलीत शेतकरी होता. चार ते पाच दिवसांत भागांतील संपूर्ण पेरणी उरकली जाईल.
परिसरात दोन तीन दिवसांपासून उष्णता जाणवत आहे. ढगाळलेले वातावरण तर कधी तीव्र उन्ह पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. आगापात घेवडा चांगला उगवला आहे. दोन पानांवर आलेले आणि पेरणी झालेले घेवडा उत्पादक आत्ता चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस होत नसल्याने, शेतकरी आभाळाकडे आस लावून बसला आहे.
खरिपाच्या या पेरणीसाठी साधारणत: बाजारात ९० ते ११० रुपये घेवडा तर वाटाणा गोल्डन ५५ ते ६० रुपये बी बियाणांचा दर होता.
गेल्या दोन हंगामात घेवडा तसेच वाटाण्याचा बाजारभाव उच्चांकी राहिल्याने या हंगामातही इतर पेरणीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी घेवडा पिकाला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे इतर पिकांचे पेरणीचे प्रमाण व क्षेत्र कमी झाले आहे.
- किरण कोरडे,
शेती सल्लागार.
फोटो २७पिंपोडे बुद्रूक
पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथील शिवारामध्ये घेवडा पेरणीची लगभग अंतिम टप्प्यात सुरू आहे. (छाया : संतोष धुमाळ)