धामणेर : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील रहिमतपूर रेल्वे क्रॉसिंग ब्रीजचे काम सुरू आहे. त्यामुळे शेजारी केलेला पर्यायी रस्ता व्यवस्थित न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे तो खचू लागला आहे. त्यामुळे अनेक अवजड वाहने अडकून पडत आहेत व वाहतूक विस्कळीत होत आहे.
गेली एक वर्ष रेल्वे स्टेशन येथील रेल्वे क्रॉसिंग ब्रीजचे काम सुरू आहे. ते काम महारेल यांनी के. एल.सी. कंपनीला दिले आहे. त्यामुळे काम सुरू होताना कंपनीने पर्यायी रस्ता मजबूत करणे, गटार काढून देणे गरजेचे होते; परंतु ते न केल्यामुळे रस्त्याला पावसामुळे ओढ्याचे स्वरूप आले होते. हा रस्ता अति वाहतुकीचा असल्यामुळे अवजड वाहने, चारचाकी गाड्या अडकून बसत आहेत. जवळजवळ चाळीस कोटींचा हा प्रकल्प आहे. तरीसुद्धा कंपनीने पर्यायी रस्त्याकडे का दुर्लक्ष केले आहे की काही तडजोडी झाल्या आहेत, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रेल्वे स्थानकाकडे जाताना सुद्धा वाहनांना कसरत करत जावे लागत आहे तसेच येथेच कॅनॉल क्रॉसिंगचे काम कंपनीने व्यवस्थित न केल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून शेतामध्ये गेल्यामुळे दोन एकर ऊस लागणीचे नुकसान झाले आहे आणि जवळच रहिमतपूर हे मोठे शहर असल्यामुळे तसेच सातारा शहराला जाण्यासाठी हा मार्ग एकमेव असल्यामुळे रुग्णवाहिका सुद्धा याच रस्त्याने जात असतात, परंतु रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे एखाद्यावेळेस रस्त्यामुळे रुग्णाचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने पर्यायी रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व रस्त्याकडील गटाराचे काम तातडीने करावे, नंतरच रेल्वे ब्रीजचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.