दहिवडी : ‘दहिवडी कॉलेजच्या विकासात माजी विद्यार्थी संघाचे बहुमूल्य योगदान आहे. येथून पुढील कालखंडातही माजी विद्यार्थी संघाशी सुसंवाद ठेवून विद्यार्थी केंद्रित उपक्रमांवर भर देण्यात येईल,’ असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत यांनी केले.
दहिवडी कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाची सर्वसाधारण बैठक नंदकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. ए. एन. दडस, समन्वयक डॉ. एम. जे. लुबाळ, सचिव डॉ. एन. डी. लोखंडे उपस्थित होते.
बैठकीत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून दहिवडी कॉलेजचे गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणे, कॉलेजच्या व समाजाच्या हिताचे विविध कार्यक्रम राबविणे, ‘नॅक’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार संघाचे कार्यक्रम घेऊन महाविद्यालयास भरीव योगदान देण्याच्या हेतूने चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांना संघाच्या कृती कार्यक्रमांची माहिती व्हावी याकरिता समाजमाध्यमांद्वारे एकत्रित करण्याबाबत निर्णय झाला.
नंदकुमार खोत यांनी सामाजिक हिताचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत निर्देश दिले. हेमंत कुलकर्णी यांनी संघाचे स्वतंत्र बोधचिन्ह असावे, अशी सूचना मांडली. डॉ. एम. जे. लुबाळ यांनी प्रास्तविक केले. यावेळी प्रा. टी. एस. माने, डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. दत्तात्रय मांजरे, प्रा श्रीमती शेख उपस्थित होते. डॉ. एन. डी. लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले तर बी. एन. नरळे यांनी आभार मानले.