सातारा : शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले जाते. सातारा जिल्ह्यात सत्ता राष्ट्रवादीची असली तरीही रस्त्यावर दहशत आणि सत्ता ही शिवसेनेची आहे. ज्या शिवसैनिकांनी आजपर्यंत पक्षनिष्ठा अबाधित ठेवून पक्षवाढीसाठी काम केले ते उद्याचे नगरसेवक, आमदार होतील. जिल्ह्यातील शिवसैनिकांना कोणतीही समस्या आल्यास त्यांच्यासाठी सदैव मी उपलब्ध आहे, असे आश्वासन नूतन जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिले.
फलटण, माण आणि खटाव तालुक्यातील दौऱ्यादरम्यान त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी फलटणचे तालुकाप्रमुख विकास राऊत, सचिन भिसे, प्रदीप झणझणे, प्रशांत मोरे, तसेच युवराज पाटील, संजय भोसले, रामभाऊ जगदाळे, बाळासाहेब मुलाणी, राहुल मंगरुळे, अमित कुलकर्णी, दगडू जगदाळे, विजयराव पाटील, अमित शेळके, नीलेश वाडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख जाधव म्हणाले, ह्मी पंधरा वर्षे शिवसेनेत आहे. आज मला माज्या पक्षनिष्ठेची पोचपावती मिळाली असून मी जिल्हाप्रमुख शिवसैनिकांच्या सेवेसाठी झालो आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या भागात शाखा काढाव्यात, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडाव्यात. पक्ष वाढीसाठी कार्य करावे. पक्षवाढी संदर्भात शिवसैनिक जोमाने काम करणार असून आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचाच झेंडा फडकणार आहे. त्याबरोबरच पक्षवाढीसाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम करणार असून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवणार आहे. मागील काळातील गट-तट बाजूला ठेवून नव्याने जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम हाती घेवून शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.