खटाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त खटाव येथील बुद्ध विहार येथे साध्यापद्धतीने अभिवादन करण्यात आले.
जयंती दिनानिमित्ताने दरवर्षी खटाव व तालुक्यातून लोक येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी अगदी साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी डाॅ. अभिमान जाधव म्हणाले, १४ एप्रिल १८९१ हा दिवस खऱ्या अर्थाने वंचित शोषितांचा सोनेरी दिवस आहे. खरे तर बाबासाहेबांनी याच वंचित गोरगरीब शोषितांसाठी असावा असे समजून घटनेमध्ये उल्लेख केला. ‘शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा’ हीच शिकवण सर्व समाजाला दिली. तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार अधिक टिकणार असून हे एक धारदार शस्र आहे म्हणून केवळ लेखणीमुळे आपण अन्यायावर मात करू. सर्व बांधवांना सांगणे हेच की निती हाच धर्म आणि मानवता हीच जात आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
वर्षा जाधव म्हणाल्या, सध्या कोरोनाच्या काळात रुग्णांना विभक्तीकरण आणि शिवाशिव यामुळे त्रास होत आहे. यावरून समजते की त्या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशा कितीतरी संकटांना सामोरे जावे लागले असेल. सध्याच्या जीवनात प्रत्येकाने जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचशील तत्त्वानुसार दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे पालन करून अवगत केल्यास खरोखरच सर्वजण सुखी, समृद्ध होतील.
फोटो ओळ : खटाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.