सातारा , दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.
येथील राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या नोंदवहीत १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी आहे.
हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुल म्हटली पाहिजे. त्यांनी शाळेत पाऊल ठेवल्यामुळेच ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि कोट्यवधी दलित व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. ते शाळेत गेल्यामुळे ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो, त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवायला लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.
आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
विद्यार्थी दिवस उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार यंदा पहिल्यांदाच ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेत घेण्यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर याविषयी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देण्यात येईल.
- पुनिता गुरव,शिक्षणाधिकारी, सातारा
राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल
साताऱ्यात नगरपालिकेच्या स्थापनेनंतर १ आॅगस्ट १८५३ नंतर पालिकेचे १८८४ मध्ये सिटी म्युनिसिपालिटीमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी मुलांच्या मराठी शाळा ८, हिंदुस्थानी मिश्र शाळा १, रात्रीची शाळा १ व मुलींकरीता १अशा ११ शाळा होत्या.
रात्रीची शाळा मजूर आणि कारागीर लोकांच्या मुलांकरीता होती. पालिकेकडे शिक्षण मंडळ येण्यापूर्वी १८६६ मध्ये साताऱ्यामध्ये ४ प्राथमिक शाळा होत्या. त्यामध्ये ५३८ विद्यार्थी होते. १८८३ पर्यंत १0 सरकारी शाळा होत्या. त्यामध्ये १ इंग्रजी शाळा, ७ मराठी मुलांच्या शाळा आणि एक मुलींची शाळा अशी स्थिती होती.
इंग्रजी शाळा प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली. या शाळेचे मुख्याध्यापक बाळशास्त्री भागवत होते. ही शाळा पूर्वी रंगमहालात होती. १८७१ मध्ये शाळेचे हायस्कुलमध्ये रुपांतर झाले.
१८७४ साली ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सध्याच्या प्रतापसिंह हायस्कुलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरु झाली. याच वास्तुमध्ये पालिकेच्या शाळा क्र. १ आणि शाळा क्र. १३ या शाळाही पाचवी ते सातवी आणि पहिली ते चौथी असे शिक्षण देत होत्या. त्यानंतर साताऱ्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या नव्या नव्या शाळा उभ्या राहिल्या.