महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पण, अवघ्या दोन तासात सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.महाबळेश्वरसह तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटात पावसाळी हंगामात वाहन चालविणे चालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. या मार्गावर घनदाट जंगल असून दाट धुके पडत आहे. त्यातच मुसळधार पाऊस होत असल्याने धोकादायक वळणावर कधी एखादा दगड वाहनावर पडू शकतो अशी भीती सतत वाहनधारकांना असते. मंगळवारी (दि.२७) रात्री रायगड जिल्हा हद्दीत दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर ताम्हिणी घाटमार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र, बुधवारी दरड काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली. असे असतानाच पुन्हा याच घाटात दरड कोसळली. त्यामुळे दोन तास वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास बांधकाम विभागाने यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला केली. नंतरच वाहतूक सुरळीत झाली.
Satara: आंबेनळी घाटात पुन्हा दरड काेसळली, दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 7:06 PM