रहिमतपूर : ‘कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेमुळे खेडोपाड्यातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणार असून, त्यांची गैरसोय दूर होईल,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी केले.
कोरोना महामारीच्या काळात रूग्णवाहिकांचा तुटवडा भासत असताना भीमराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रूग्णवाहिका देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या मान्यतेने रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. वाठार किरोली आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भीमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम, शुभांगी काकडे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. असिफ जमादार, डॉ. दत्ता खांडेकर, उद्धव राऊत, गुजर, माळवदे, आरोग्य कर्मचारी, रुग्ण कल्याण समितीचे सर्व सदस्य, वाठारचे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच शंकर गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
भीमराव पाटील म्हणाले, ‘रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करावे.’
फोटो : २२ रहिमतपूर
वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भीमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : जयदीप जाधव)