जगदीश कोष्टी - सातारा -शहरातील अरुंद रस्ते अन् वाहनांची गर्दी यामुळे रुग्णवाहिकांना मुंगीच्या वेगाने जावे लागते. असंख्य वाहने रस्ताच देत नाहीत, त्यामुळे या गर्दीतून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न रुग्णवाहिकांच्या चालकांना सतावत असतो.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाढे फाटा येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सोमवारी पहाटे सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यामध्येच एक रुग्णवाहिकाही अडकली होती. त्यांना रुग्णालयात वेळेवरच पोहोचता न आल्याने रुग्णाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.सातारा शहरातील असंख्य महत्त्वाचे दवाखाने पोवईनाक्याच्या पलिकडे आहेत. पोवईनाक्याच्या पश्चिमेला मोठी वसाहत आहे. राजवाडा, मंगळवार पेठ, व्यंकटपुरा, चिमणपुरा, झोपडपट्टी, बोगदा परिसरातही मोठ्या संख्येने लोक राहतात. त्याचप्रमाणे जकातवाडी, पेढ्याचा भैरोबा, आंबेदरेपर्यंत शहराचा विस्तार होत आहे. या परिसरात रुग्णालये आहेत, मात्र हृदयविकारासारख्या गंभीर आजारांवर इलाज करायचा असल्यास जिल्हा रुग्णालय किंवा इतर मोठ्या रुग्णालयांसाठी पोवई नाका पलिकडेच जावे लागते. प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी हलविले जाते. रुग्णांना कमी वेळेत मोठ्या दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले जाते. खालच्या रस्त्यावर मोती चौक ते गुरुवार परज या दरम्यान अरुंद रस्ता आहे. तसेच रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केलेली असतात. दुसऱ्या बाजूला विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी असते. या गर्दीतून सर्वसामान्य वाहनांचाच वेग मंदावलेला असतो. त्यामुळे रुग्णवाहिका नेणे अवघड जाते. शहरातील मुख्य रस्त्यांवर एकेरी वाहतूक केली जात असली तरी यातून रुग्णवाहिका, अग्निशमन बंबाला अपवाद केला आहे. रुग्णांसाठी एक-एक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे राजवाडा परिसरात सायंकाळी रुग्णवाहिका आली असता चौपाटीजवळ कितीही सायरन वाजविला तरी रस्ताच दिला जात नाही. मोतीचौकात राजपथावरुन पोवईनाक्याला जाण्याच्या मार्गावर बॅरेगेट लावलेले असतात. अशावेळी रुग्णवाहिकांना ट्रॅक ओलांडताना समोरुन येणारी वाहने रस्ताच देत नाहीत. त्यामुळे रुग्णवाहिकांना काही वेळ बाजूला थांबावे लागते. रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाली असेल तर आपण आपले वाहन बाजूला घेतले पाहिजे हेच अनेक वाहनचालकांना माहित नसल्यासारखे जाणवते. रस्त्याच्या कडेला मालट्रक उभे असल्यास त्याच ठिकाणी रुग्णवाहिकेचा आवाज ऐकू आल्यावर इतर वाहनांनी थांबने अपेक्षित असते. रुग्णवाहिकेलाच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाचा खेळ होत आहे. पोवईनाक्यावरील पोलीस सेवेतपोवईनाका परिसरात दररोज वाहतूक शाखेचे सरासरी चार पोलीस कार्यरत असतात. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा असल्याने रुग्णवाहिका आलेली दिसल्यास पोलीस स्वत: पुढे जाऊन वाहनांना थांबवून रुग्णवाहिकेला रस्ता काढून देत असतात.पोलीस, अग्निशमन किंवा रुग्णवाहिका या तीनच गाड्यांना सायरन असतो. यातील कोणतेही वाहन सायरन वाजवत आले तर इतर वाहनचालकांनी स्वयंशिस्तीनं बाजूला होऊन रस्ता देणं अपेक्षित आहे. - श्रीगणेश कानगुडेसहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, साताराही आहेत गर्दीची ठिकाणीपोवई नाका, राजवाडा, मोती चौक, देवी चौक, खालचा रस्ता, मध्यवर्ती बसस्थानक, साई मंदिर गोडोलीसाताऱ्यातील वाहतुकीला शिस्तच नाही. गल्लीबोळातून येणारी वाहने कशीही मुख्यरस्त्याला मिळतात. त्यामुळे रुग्णांना कमी वेळेत पोहोचवाचे म्हटले तर अवघड जाते.- राजेश नायडूरुग्णवाहिका मालक
रुग्णवाहिकांचा प्रवास मुंगीच्या पावलांनी!
By admin | Published: July 24, 2015 10:23 PM