मेढा : जावळीच्या जनतेला सर्वसामान्य आमदार म्हणून अमित कदम हेच योग्य उमेदवार असणार आहेत. ‘अमित, तू फक्त हो म्हण. नाही आमदार केलं तर आपण मूँछ काढून देईन,’ असा इरादाच खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केला. ‘इथल्या आमदारांना जावळीत आल्यावर वाघ झाल्यासारखे वाटते; पण मी इथं आलो की ते मांजर कसे होतात,’ अशी घणाघाती टीकाही त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता केली. येथील नक्षत्र मंगल कार्यालयात माजी आमदार जी. जी. कदम (अण्णा) यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील काटकर, बाबासाहेब कदम, जावळीचे सभापती मोहन शिंदे, दत्ता पवार, पांडुरंग जवळ आदी उपस्थित होते. खासदार उदयनराजे म्हणाले, ‘कुठं जी. जी. अण्णा व कुठं आताचे जावळीचे आमदार. यांना जनतेची जपणूक करता येत नसून ते चोपणूक करत आहेत. इथल्या आमदारांना जावळीत आल्यावर वाघ झाल्यासारखे वाटते; पण मी इथं आलो की ते मांजर कसे होतात. सातबाऱ्याचा विषय काय घेऊन बसलाय मी निवडणूक झाली की जावळीतील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सातबारा कोरा करणार आहे. त्यामुळे माझ्यावर कुणी टीका करण्याची गरज नाही. ही जनताच माझे सर्वस्व असून, सर्वसामान्य जनतेत राहण्यातच मी माझे श्रेष्ठत्व मानतो. पद येतात अन् जातात; परंतु गोरगरीब कुटुंबाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मी सोडवणार आहे. बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन जनतेचा प्रश्न मार्गी लावणार आहे. बाधित शेतकऱ्यांना शासनाने जमिनी नाही दिल्या तर मी स्वत: त्या शेतकऱ्यांना माझी जमीन देईन. त्यामुळे लोकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या विचाराने पुढील वाटचाल करावी.’ आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जनमाणसाचे नेतृत्व दिवंगत जी. जी. आण्णांनी केले असून, आजही त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेच्या स्मरणात आहेत. म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता वीस वर्षांनंतरही आण्णांना आदरांजली वाहण्यासाठी येत आहे.’सदाशिव सपकाळ म्हणाले, ‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन आण्णांनी माझ्यावर प्रेम केले. मी त्यांना पराभूत केले. तरीही खिलाडूवृत्तीने त्यांनी ते स्वीकारून उलट मलाच विधानसभेत कशा पद्धतीने प्रश्न मांडावेत, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात अमितचे जनमाणसात विकास-कामांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम असून, अमितसाठी पुढील काळात आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’ जगन्नाथ वाडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पुढचे आमदार अमित कदमच!
By admin | Published: January 22, 2017 11:46 PM