वडूज : बिहारमधील पाटणा येथे गुरसाळे (ता. खटाव, जि. सातारा) गावचे अमोल जाधव यांचे कुटुंब राहत होते. गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन कुटुंबातील चारही लोक मोठ्या प्रमाणात भाजले होते. यामध्ये त्यांचा मुलगा संग्राम जाधव (वय ११) व पत्नी रोहिणी जाधव (वय ३५) यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.गत आठवड्यापूर्वी पाटणा येथील राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन जाधव कुटुंबातील चारही जण मोठ्या प्रमाणात भाजले होते. त्यांना तत्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणाहून आणण्याची व्यवस्था खर्चिक असल्याने त्यांच्या मित्र परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून मदत केली. त्या जखमी कुटुंबाला उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले.मात्र, जखमीमध्ये रोहिणी जाधव व संग्राम जाधव यांची प्रकृती चिंताजनक होती. बुधवार, दि. २० रोजी रोजी अकरा वर्षांच्या संग्रामची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. तर पस्तीस वर्षाच्या रोहिणी यांचाही गुरुवार, दि. २१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत माय-लेकरावर पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरसाळेतील माय-लेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली पालकत्वाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:24 PM