-मुराद पटेल, साताराजुन्या वादातून एका तरुणाची तलवारीने सपासप वार करत हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे ही घटना घडली. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या तलवारीसह पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसही हादरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिरवळ (ता.खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये जुन्या औदयोगिक वसाहतीतील एका कंपनीलगत असणाऱ्या चौकात एका युवकाचा तलवारीने सपासप वार करीत खून करण्यात आला. पूर्वीच्या भांडणातून ही हत्या करण्यात आली.
खून करणारा युवक स्वतःहून शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये हत्यारासहित हजर झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलीसांनी युवकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हत्या झालेला तरुण कोण?
अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (वय 22,रा. वडवाडी, ता.खंडाळा) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तेजस महेंद्र निगडे (वय 19,रा. गुणंद, ता.भोर जि.पुणे) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळ पोलीस निरीक्षक संदिप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस स्टेशनला सुरू आहे.