सातारा : आले उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या लढ्याला यश आले असून शासनाने आदेशच काढला आहे. या आदेशाने आता सरसकट आले खरेदी होणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातीलही शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आले पीक घेण्यात येते. सध्या आल्याला चांगला दरही मिळत आहे. पण, आले खरेदी करताना व्यापारी प्रतवारी करत होते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. या विरोधात जून महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा उभारला. त्यावेळी उपनिबंधक कार्यालयाने बाजार समिती तसेच व्यापाऱ्यांनाही सरसकट आले खरेदीबाबत सूचना केली होती. तर आता महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालयाने परिपत्रकच काढले आहे.केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीवर शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र, आले या शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत लागू नाही. राज्यातील आले उत्पादक शेतकरी हा व्यापारी आणि दलाली यांच्या मनमानी कारभारामुळे भरडला जातोय. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी निवेदन दिले होते. यावर पणनमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी जुने आणि नवे आले अशी प्रतवारी न करता खरेदी करावी. प्रतवारीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, अशी मागणी केली होती. त्यामुळे पणनमंत्र्यांनी आले खरेदीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील सर्वच बाजार समित्यांना सूचना केली होती. त्यानुसार पणन संचालयाने परिपत्रक काढले आहे.बाजार समितीने परंपरागत पध्दतीने सरसकट आले खरेदीबाबत अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडते यांना सूचना करावी. जुने व नवे आले वेगळे आणण्याचा आग्रह धरु नये. आले खरेदीचा व्यवहार झाल्यावर साैदा पट्टी करावी. त्यावर दर कसा दिला याचा उल्लेख अधिकृत बिलावर करावा. काही तक्रारी आल्यास बाजार समितीने तत्काळ निवारण करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वागत..आले खरेदी करताना प्रतवारी करु नये याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा दिला होता. यामध्ये शेतकरीही सहभागी झाले होते. याबाबत पणन संचालयाने परिपत्रक काढून सरसकट आले खरेदीबाबत सूचना केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाच्या या आदेशाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्वागत आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना