राजीव मुळ्ये - सातारा -मोगलीच्या ‘जंगलबुक’मधील ‘बगीरा’ म्हणून लहानग्यांना परिचित असलेला देखणा काळा बिबट्या शुक्रवारी पहाटे साताऱ्यानजीक महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडला. बिबट्यांचा भ्रमणमार्ग माहीत असूनही विविध खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बिबट्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाय योजले जात नाहीत. या अनास्थेमुळेच अवघ्या सव्वा वर्षात एकाच ठिकाणी दोन बिबट्यांना वाहनाची धडक बसून प्राण गमवावे लागले.काळा बिबट्या ही वेगळी प्रजाती नसून, तोही सर्वसामान्य बिबट्याच; पण त्वचेतील ‘मेलनिन’ वेगळे असल्याने त्याचा रंग काळा असतो. जवळून पाहिल्यास बिबट्याच्या अंगावर जशी फुलाफुलांची नक्षी दिसते, तीच अगदी धूसर स्वरूपात काळ्या बिबट्याच्या अंगावरही दिसते. काळ्या केसांमुळे त्याच्या शरीरावर एक प्रकारची तकाकी असते. काळा बिबट्या हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्यामुळे आपण एक मोठी दौलत हरवल्याची भावना वन्यजीवप्रेमी सातारकरांमध्ये शुक्रवारी आढळून आली. बिबट्यांचे संंवर्धन करण्यात यंत्रणेच्या अपयशाबद्दलची चीडही सोशल मीडियावरून ओसंडून वाहिली.महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झाला, अगदी त्याच परिसरात डिसेंबर २०१३ मध्ये एक बिबट्या रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची ‘शिकार’ ठरला होता. या ठिकाणापासून जवळच असलेल्या डोंगरावर बिबट्यांंचे दर्शन अनेकांना, अनेकदा झाले आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी हा काळा बिबट्या अगदी लहान असतानाही त्याच्या आईबरोबर पाहिला आहे. सामान्यत: बछडे तीन महिन्यांचे झाल्यानंतर त्यांची आई त्यांना अधिवासातून बाहेर आणते आणि कायम सोबत राहून राखण करते. बछडे वयात येऊ लागले की आईला सोडून एकटे फिरू लागतात. शुक्रवारच्या अपघातात मृत्युमुखी पडलेला काळा बिबट्या असाच तारुण्याच्या उंबरठ्यावरचा देखणा नर!महामार्गालगत असलेल्या डोंगरराजीपासून थेट कासपर्यंत बिबट्यांचा भ्रमणमार्ग आहे. त्यामुळे या डोंगरपायथ्यांशी वसलेल्या गावांमध्येही अधूनमधून बिबटे दिसतात. ग्रामस्थांच्या शेळ्या, वासरे आणि मुख्य म्हणजे गावातल्या कुत्र्यांना बिबटे सर्रास पळवून नेतात. कधी-कधी मानव-वन्यजीव संघर्षही उभा राहतो. मात्र, वनविभाग आणि इतर विभागांमध्ये ताळमेळाचा अभाव असल्याने हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी ठोस उपाय योजले जात नाहीत. महामार्गाजवळ तर अनेक उपाययोजना करण्याची तातडीने गरज असून, पर्यावरणवादी संस्था या घटनेनंतर अशा उपाययोजनांसाठी पुन्हा मागणी करू लागल्या आहेत. हा ‘जग्वार’ नव्हे...काळा बिबट्या मृत्युमुखी पडल्याची बातमी पसरताच हा बिबट्या नसून ‘जग्वार’ असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. तथापि, बिबट्यापेक्षा किंचित गडद रंगाचा, मोठ्या फुलांची नक्षी असलेला, भक्ष्याची कवटी फोडून त्याला ठार करणारा ‘जग्वार’ (पँथरा आॅन्का) मध्य आणि दक्षिण अमेरिकेत सापडतो. बिबट्या (पँथरा पार्डस) आफ्रिका आणि आशियात सापडतो. भारतात सापडणारी प्रजाती ‘पँथरा पार्डस फ्युस्का’ होय.काळा... मग बिबट्या कसा?सामान्य बिबट्याही काळा असू शकतो; मात्र असे बिबटे दुर्मिळ असतात. एकाच आईच्या पोटी एक पिवळा आणि दुसरा काळा बिबट्या जन्मास येऊ शकतो. त्वचेतील ‘मेलनिन’च्या फरकामुळे तो काळा असतो, इतकेच!कधी होणार उपाययोजना?महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी बिबट्यांचे वावरक्षेत्र आहे. एकाच ठिकाणी दोन अपघातही झाले आहेत. महामार्ग प्राधिकरणाला सांगून रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचे फलक तरी एव्हाना लागायला हवे होते. बिबट्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठ्या पाइपचा मार्ग करणेही शक्य आहे. महामार्गालगत जाळीचा पर्याय काहीजण सुचवितात; मात्र तसे केल्यास दिशाभूल झालेला बिबट्या आसपासच्या मानवी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका असतो. वयात आलेला देखणा जीवबिबट्याच्या शरीराची मोजमापे घेतली असता, त्याचे अंदाजे वय २३ महिने असल्याचे निदर्शनास आले. हा बिबट्या कुपोषित बिलकूल नव्हता. खाण्यापिण्याची आबाळ झाली नसल्याने तो ठणठणीत होता. परिसरातील डोंगरात असलेल्या वस्तीत काही दिवसांपूर्वीच दोन बोकड फस्त करणारा बिबट्या हाच असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. तो निरोगी तर होताच; शिवाय नुकताच वयात आल्यामुळे अत्यंत देखणा होता. शहराच्या जवळपास पहाटे फिरायला जाणाऱ्या अनेकांना हा बिबट्या दिसला होता. ही मंडळीही रोपवाटिकेत त्याला मृतावस्थेत बघायला धावली. असा होता काळा बिबट्यावयात आलेला नरशरीराची लांबी ४७.३२ इंचशेपटीची लांबी २९ इंचएकूण लांबी ७६.३२ इंचनाकापासून डोक्याची लांबी १० इंचवरच्या सुळ्याची लांबी २४.१८ मिलीमीटरखालच्या सुळ्याची लांबी २३.९९ मिलीमीटर
दुर्मिळ ‘बगीरा’ ठरला अनास्थेचा दुर्दैवी बळी!
By admin | Published: March 27, 2015 11:47 PM