सातारा : कोणी फिरत्या चाकावर मातीच्या भांड्यांना आकार देतंय, तर कोणी लाकडी लाटणी बनविण्यात व्यस्त आहे. माणदेशातल्या उद्योजिका महिला महोत्सवाच्या निमित्ताने साताºयात येऊन निखळ निर्मितीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
माणदेशी फांउडेशनच्या वतीने गुरुवारपासून सातारा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर माणदेशी महोत्सव भरला आहे. या महोत्सवासाठी माणदेशातल्या महिला भगिनी स्वनिर्मित वस्तू घेऊन आल्या आहेत. त्यामध्ये लाटणे, पळपूट, मातीच्या चुली, मातीची भांडी, तवे, जाती, कढया अशा वस्तू आहेत. गेल्या सात वर्षांपूर्वी महोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा माणदेशी घोंगडी व इतर गृहउद्योगातील वस्तू पाहायला मिळत होत्या.
यंदाच्या महोत्सवात चक्क माणदेशातील भाजीचे स्टॉलही आले आहेत. म्हसवडला माणदेशी फांउडेशनच्या माध्यमातून माणगंगा नदीवर मोठा बंधारा बांधला आहे. या बंधाºयामुळे नदीचे पाणी अडले तसेच आजूबाजूच्या विहिरींनाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले. त्यामुळे हंगामी पिके घेणारे शेतकरी आता बागायती पिकांकडे वळले आहेत. म्हसवड येथील शेतकरी विजय लिंगे सांगत होते. १२ एकरांत आता बागायत होती. वांगी, भेंडी, मेथीची भाजी घेऊन ते महोत्सवात सहभागी झाले होते.
या महोत्सवात केवळ माणदेश व साताºयातील महिलांचे स्टॉल नाहीत तर हैद्राबाद, काश्मीर येथूनही मोठ्या प्रमाणावर स्टॉल आले आहेत. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. लोक उत्सुकतेने माहिती घेताना पाहायला मिळत होते.
कोंबड्यांचा खुराडा -वडूजचे संतोष जाधव हे बांबूपासून बनविलेल्या वस्तू घेऊन आले आहेत. टोपली, फुलदाणी, सूप यासोबतच त्यांनी आणलेला कोंबड्यांचा खुराडाही लक्ष वेधत आहे.म्हसवडातही पिकतंय आता माळवं--म्हसवडात पूर्वी पाण्याअभावी बागायती पिके मर्यादित स्वरुपात घेतली जात होती. आता मात्र पश्चिम भागाप्रमाणेच या परिसरात बागायत पिके घेतली जात असून, त्याची विक्री महोत्सवात केली जात आहे.मातीची चूल अन् भांडी--म्हसवड येथील भारत कुंभार मातीची भांडी घेऊन महोत्सवात दाखल झाले आहेत. मातीची भाजलेली चूल, मडकी, विविध भांडी, दही ठेवण्याचे भांडे, भाजीची भांडी त्यांनी आणली आहेत