ठाणे : आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्यासाठी डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला दुर्दैवी अपघात झाला होता.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलै रोजी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने 30 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबांवर आभाळ कोसळले असून, त्यांना समाजाबरोबरच सरकारनेही आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसाला प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांना तातडीने नोकरी देणे गरजेचे आहे, याकडे आमदार डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार, मृत कुटुंबांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते. मात्र, अनुकंपा तत्वावरील सेवेत समाविष्ट होण्यासाठी सर्व नियम व निकषांची अंमलबजावणी केली जाते. या प्रकरणात एकाच संस्थेतील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून 30 मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.