कवठेमहांकाळ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांगोळे व लंगरपेठ विकास सोसायटीच्या निवडणुकीत माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांच्या नेतृत्वाखालील आबा-सगरे गटाच्या शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत काका-सरकार गटाचा धुव्वा उडवला, तर कुकटोळीच्या विकास सोसायटी निवडणुकीत काका-सरकार गटाकडून आबा-सगरे गटाला पराभव पत्करावा लागला.नांगोळे येथील विकास सोसायटीची निवडणूक तालुक्यात चर्चेची व लक्षवेधी ठरली. कारण माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांचे आबा-अण्णा शेतकरी पॅनेल पराभूत करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यापासून फिल्डिंग लावली होती. परंतु दादासाहेब कोळेकर यंनी विजय सगरे यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सर्व १३ जागांवर आबा-सगरे गटाच्या उमेदवारांनी सरासरी अडीचशेवर मताधिक्याने विजय मिळविला.विजयी उमेदवारांमध्ये दादासाहेब कोळेकर, मकबूल पाटील, सच्चिदानंद सावळे, लक्ष्मण हाक्के, आबा मासाळ, वसंत हुबाले, राजाराम हुबाले, बापूसाहेब गिड्डे, तानाजी गोंधळे, नारायण कुंभार, अण्णासाहेब कोळेकर, कलावती हुबाले, जनाबाई नरळे यांचा समावेश आहे.लंगरपेठ विकास सोसायटीच्या निवडणुकीतही महेश पवार, आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील आबा-अण्णा शेतकरी विकास पॅनेलने सर्व अकरा जागांवर विजय संपादन करत विरोधी काका-सरकार पॅनेलला चारीमुंड्या चित केले. कुकटोळी विकास-सोसायटी निवडणुकीत सरकार गटाचे जि. प. सदस्य तानाजी यमगर यांच्या नेतृत्वा खालील पॅनेलने आबा-सगरे गटाच्या पॅनेलचा दारुण पराभव केला. विजयी काका-सरकार गटाच्या पॅनेलचे नेतृत्व तानाजी यमगर, प्रशांत घुळी, राहुल कारंडे, श्रीकांत हजारे, विनायक चव्हाण यांनी केले. (वार्ताहर)
लंगरपेठ, नांगोळेत आर. आर. आबा, कुकटोळीत खासदार गटाची बाजी
By admin | Published: February 27, 2015 10:29 PM