सातारा : मासिक सभेच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी विनंती करूनही मुख्याधिकारी शंकर गोरे हे कक्षात न आल्याने दस्तुरखुद्द नगराध्यक्षा माधवी कदम यांनाच आपली खुर्ची सोडून मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये जावे लागले. सातारा पालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली असावी.
सातारा पालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. या सभेपूर्वी विचार-विनिमय करूनच सर्व ठराव अजेंड्यावर घेतले जातात. बुधवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम यांना फोन करून खासदार उदयनराजे भोसले यांनी काही विषयांची माहिती विचारली.
ही माहिती जाणून घेण्यासाठी तसेच अजेंड्यावरील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना केबीनमध्ये येण्याचा निरोप दिला. दरम्यान, याचवेळी मुख्याधिकारी त्यांच्या केबीनमध्ये सातारा विकास आघाडीतील काही नगरसेवकांशी चर्चा करीत होते.
दोनवेळा निरोप पाठवून अन् सुमारे पाऊणतास वाट पाहूनही मुख्याधिकारी न आल्याने अखेर नगराध्यक्षा माधवी कदम यांनाच आपल्या खुर्चीवरून उठावे लागले. यानंतर त्यांनी स्वत: मुख्याधिकाºयांच्या केबीनमध्ये जाऊन अत्यावश्यक माहिती जाणून घेतली. दरम्यान, सातारा पालिकेच्या इतिहासात नगराध्यक्षांवर प्रथमच खुर्ची सोडून मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये जाण्याची वेळ ओढावल्याने प्रशासनाची कार्यपद्धती उघडकीस आली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांना तातडीने काही माहिती हवी होती. यासाठीच मुख्याधिकाºयांना केबीनमध्ये येण्याचा निरोप दिला. मात्र, पाऊणतास होऊनही ते न आल्याने त्यांच्या केबीनमध्ये जावे लागले. आत्तापर्यंत अशाप्रकारच्या तीन वेळा घटना घडल्या आहेत.- माधवी कदम, नगराध्यक्षानगराध्यक्षांचा निरोप मिळाल्यानंतर मुख्याधिकाºयांनी हातातील काम सोडून त्यांच्या दालनात जाणे गरजेचे आहे. मात्र, नगराध्यक्षांनाच त्यांच्या दालनात जावे लागते, हे चुकीचे आहे. यावरून नगराध्यक्षांचा प्रशासनावर किती वचक आहे? हे स्पष्ट होते.- अशोक मोने, विरोधी पक्ष नेते, नविआ.मुख्याधिकाऱ्यांचा निरोप मिळाला त्याचवेळी सत्ताधारी आघाडीच्या काही नगरसेवकांची केबीनमध्ये मीटिंग सुरू होती. निरोपानंतर केवळ दहा मिनिटांतच नगराध्यक्षा केबीनमध्ये आल्या. त्यांच्या केबीनमध्ये न जाण्यामागे कोणताही हेतू नव्हता. याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे.- शंकर गोरे, मुख्याधिकारी