सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर या आंदोलनात शेकडोच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे महासचिव अॅड. शाैकतभाई पठाण, राज्याध्यक्षा सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर यांच्यासह संघटक अजय नलावडे, संदीप माने, विठ्ठल सुळे आदींसह शेकडोच्या संख्येत सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सेविका आणि मदतनीसांनी रस्त्याच्या बाजुला ठिय्या मांडला होता. यावेळी विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर महासचिव अॅड. शाैकतभाई पठाण यांनी सेविका आणि मदतनीसांना मार्गदर्शन करत आंदोलनाची भूमिका सांगितली.दरम्यान, जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आंदोलन केले. याठिकाणी स्वतंत्र मंडप टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. यावेळी मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा गायकवाड, सरचिटणीस वनिता वाडकर आदींसह सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे विविध मागण्यांसाठी साताऱ्यात आंदोलन
By नितीन काळेल | Published: December 04, 2023 6:35 PM