नितीन काळेल सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४ हजार २३१ अंगणवाड्यांना टाळा आहे. परिणामी सुमारे ५० हजारांहून अधिक बालकं शिक्षणाशिवाय घरी आहेत. तर मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही दिला आहे.अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, चर्चा आणि आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे सोमवारपासून राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत.या संपाबाबत पाठीमागील आठवड्यातच संबंधितांना निवेदन देण्यात आलेले. तर संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. तर मागील तीन दिवस जिल्हा परिषदेसमोरही सेविकांचे आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ४ हजार २३१ अंगणवाड्या बंद आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणही थांबले आहे.
सेविका, मदतनीसांच्या या आहेत मागण्या..
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी घोषित करावे.
- वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा.
- मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. यासाठी दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी.
- कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करुन हिवाळी अधिवेशनातच मंजूर करावा.
- महानगर पालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे.
- आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असल्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याएेवजी वाढत चालले आहे. सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अतिकुपोषित बालकासाठी २४ रुपये दर करावा.
३२९ अंगणवाड्या सुरू; पटनोंदणीची ६१ हजारांवर बालके..सर्व्हेप्रमाणे जिल्ह्यात ३ ते ६ वयोगटातील बालकांची संख्या ७३ हजार २२९ आहे. त्यामधील अंगणवाडीत पटनोंदणी झालेले ६१ हजार ८८३ बालके आहेत. सध्या जिल्ह्यात ४ हजार ५६० अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यातील ४ हजार २३१ अंगणवाड्यांना संपामुळे टाळा लागला आहे. त्यामुळे सध्या ३२९ अंगणवाड्याच सुरू आहेत. अंगणवाड्या बंद असल्याने ५० हजारांहून अधिक मुले घरी आहेत. तर जिल्ह्यात १९ प्रकल्प असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यात सर्वाधिक अंगणवाड्या बंद आहेत.