सातारा : जिल्ह्यातील कोणत्याही संघटनेत सामील नसणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आणि २५ हजार रुपये मानधनासाठी निवेदन दिले. यावेळी त्यांनी स्वत:चा लढा, स्वत:साठी अशी घोषणा देत दि. ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी लढा सुरू आहे. अजुनही अनेक मागण्या मान्य झालेल्या नाहीत. आता जिल्ह्यातील काही अंगणवाडी सेविकांनी एकत्र येत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामध्ये स्वत:चा लढा स्वत:साठी, आमची कोणती संघटना नाही.. असे म्हणत मागण्या केल्या आहेत. यामध्ये केंद्र शासनाने सेविका आणि मदतनीसांची मानधन वाढ करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, २५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, सेविकांची पर्यवेक्षिकांत पदोन्नती पूर्वीप्रमाणे करावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास दि. ४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उषा पाटील, सुनीता देवकर, चैताली सावंत, सुनंदा पुजारी, कल्पना जाधव, सुजाता शेवडे, सायली जंगम, माधवी शिंदे, पूजा नवले, मयुरी बडेकर, अर्चना गायकवाड आदी उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविकांचा नारा, स्वत:चा लढा, स्वत:साठी; ४ डिसेंबरपासून बेमुदत संप
By नितीन काळेल | Published: November 23, 2023 6:19 PM