सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रामपंचायती हा गावाचा कणा आहेत, अशा ग्रामपंचायतींमध्ये स्वत: सत्ता उपभोगून, त्याद्वारे गैरव्यवहार करून गावाला लुटणारे आता पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सातारा तालुक्यातील अंगापूर आणि कोडोलीमध्ये तसे चित्र स्पष्ट दिसत असून, गैरव्यवहारांचे सूत्रधार आता निवडणुकीद्वारे ‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन’ अशा वल्गना करत आहेत. सामान्य मतदारांनी याबाबत वस्तुस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांना थेट मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केले आहे.
कोडोलीचा विषय तर फार वेगळाच आहे, असे म्हणावे लागणार आहे. ज्यांना जनतेने खुल्या मनाने निवडून दिले, ज्यांनी गावाचा विकास साधायचा होता, त्यांनी ग्रामपंचायतीला लुटण्याचे काम केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येदेखील कोडोलीच्या विषयाने गदारोळ केला होता. कोडोलीमध्ये सरपंच, उपसरपंच व अन्य दोन सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे समोर आल्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी २४ फेब्रुवारी २०२० रोजी एक आदेश काढून, या मंडळींना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. सहा वर्षे जर आपण थांबलो तर आपला स्वत:चा आणि बगलबच्चांचा कसा विकास होणार, या भीतीने राजकीय कुरघोड्या करत या मंडळींनी ६ मार्च २०२० रोजी मंत्रालयातून आपल्यावरील कारवाईला स्थगिती मिळवली होती. ही स्थगिती देत असतानाच ११ मार्च २०२० रोजी वरील विषयांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे ग्रामविकासमंत्र्यांनी स्पष्ट निर्देशदेखील दिले होते, असेही चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
चौकट
न्यायालयात दाद मागणार
या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप असलेले लोक जरी विजयी झाले तरी आम्ही न्यायालयात याविषयी निश्चित दाद मागणार आहोत. ज्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असून, न्यायालयाच्या आदेशाद्वारे आम्ही या मंडळींना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवू, असा विश्वास श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी व्यक्त केला. राजकीय आश्रय मिळाला म्हणजे जिंकलो असे नाही, तर जनतेच्या न्यायालयात त्यांना आपली जागा कळून येईल, असेही श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी नमूद केले.