अंगापूर : सातारा तालुक्यातील अंगापूर-वर्णे रोडवरील गडशिंग शिवारातील रोपवाटिका, पाॅलिहाऊस आग लागल्याने जळून खाक झाली आहे. या आगीत अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अंगापूर वंदन येथील शेतकरी संतोष कणसे व जितेंद्र कणसे यांची वर्णे-अंगापूर रोडवर असणाऱ्या स्वमालकीच्या गडशिंग शिवारात ऊस रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांची सोय तसेच या व्यवसायातून अर्थाजन प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने, अनेक अडचणींवर मात करीत रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या पाॅलिहाऊसमध्ये कोणीही नसल्याची खात्री करून अज्ञात व्यक्तीने या ऊस रोपवाटिकेला आग लावल्याने पाॅलिहाऊस जळून खाक झाले आहे. या आगीत अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी या रोपवाटिकेकडे धाव घेतली. तोपर्यंत नवीन लागवडीसाठी तयार करण्यात आलेली दीड लाख रोपे, ट्रे, सेडनेट, पाॅलिथीन पेपर, प्लास्टिकचे कागद, बियाणे, व्हाईट पाईपलाईन, तसेच इतर सर्व शेतीविषयक साहित्य जळून खाक झाले होते. मुळातच शेती व्यवसाय अडचणीत असताना शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहेत.. अशाच परिस्थितीत असे हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक कृत्य केल्याचा आरोप रोपवाटिका मालक संतोष कणसे यांनी केला आहे.
अशा घटना सध्या वारंवार घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशा विकृतीचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, ही माहिती संतोष कणसे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगीच्या घटनांना ऊत...गेल्या काही महिन्यांपासून अंगापूर परिसरात आग लावून नुकसान करण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. तसेच फळबागांचे नुकसान करणे, वाहनांची मोडतोड करणे, अशा घटनांना ऊत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. अशा विकृत प्रवृत्ती वाढत असून, अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.