नागठाणे : देशमुखनगर (ता. सातारा) येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी युवकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दत्तात्रय जाधव (रा. निसराळे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना साथरोगाचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी बोरगाव पोलिसांनी देशमुखनगर येथे फिक्स पॉर्इंट नेमले होते. रविवारी सकाळी पोलीस जवान राहुल भोये व इतर कर्मचारी हे बंदोबस्त करत होते.
दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेल्या युवकांना जवान राहुल भोये यांनी गाडी थांबविण्याचा इशारा केला. मात्र, मोकळ्या जागेतून दुचाकी पुढे दामटण्याचा प्रयत्न केला.राहुल भोये यांनी दुचाकी शिताफीने थांबवली. यावेळी पाठीमागे बसलेले दोघे पळून गेले.
चालकास पोलिसांनी नाव, गाव विचारले असता त्याने स्वत:चे नाव विकास दत्तात्रय जाधव सांगून ह्यतू माझी गाडी का अडवलीस? तुला पोलीस कोणी केले. दोन मिनिटांत तुझी नोकरी घालवतो, तू कालचा भरती आहेस,ह्ण असे म्हणून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली.
या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर विकास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर तपास करत आहेत.