कराड : पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी यापैकी कोणालाच विश्वासात न घेता तालुक्यातील 40 अंगणवाड्यांची स्मार्ट अंगणवाडी म्हणून निवड केल्याने एकात्मिक बालविकास विभागाच्या कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्या 40 अंगणवाड्या निवडल्या कशा, कोणी निवडल्या, असा प्रश्नांचा भडिमार सदस्यांनी केला.
कराड पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी झाली. सभापती प्रणव ताटे अध्यक्षस्थानी होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची उपस्थिती होती. एकात्मिक बालविकास विभागाचा आढावा प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार यांनी दिला. यावेळी त्यांनी तालुक्यातील 40 अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. यावर सदस्या फरिदा इनामदार यांनी हरकत घेत या अंगणवाड्यांची निवड कोणी केली, कोणत्या निकषावर केली, असे प्रश्न उपस्थित केले.
याबाबत खुलासा करताना पोवार म्हणाल्या, स्मार्ट अंगणवाड्यांची निवड पर्यवेक्षिकांनी केली आहे. यादी तात्काळ सादर करावयाची असल्याने कोणाला कल्पना देता आली नाही. यावर फरिदा इनामदार म्हणाल्या, ही पळवाट झाली. उंडाळे विभागातील एकाही अंगणवाडीचा स्मार्ट अंगणवाडीमध्ये समावेश नसल्याने या निवड प्रक्रियेवरच त्यांनी संशय व्यक्त केला.
रमेश चव्हाण यांनी बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत प्रश्न उपस्थित केला. आहार एक महिना उशिरा मिळाला तरी तुम्ही याची कल्पना सभापती अथवा गटविकास अधिकाऱ्यांना का दिली नाही, पोषण आहारात दिले जाणारे साहित्य तपासून बघा, अशी सूचनाही काही सदस्यांनी केली.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा उपअभियंता ए.बी. जोशी यांना दिला. यावेळी सदस्यांनी तालुक्यात किती गावांत टंचाई आणि टंचाई निवारणासाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी जोशी म्हणाले, टंचाई आराखडा तयार केला आहे.
शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षणणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिला. आरोग्य विभागाच्या आढाव्यादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी एक एप्रिलपासून उपकेंद्राच्या 45 ठिकाणी कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाय शहरात काही खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.