लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आपत्ती आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने सक्रिय होण्यापेक्षा ती येऊच नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वनविभागासह महसूल, कृषी, पाटबंधारे विभागाने एकत्र येऊन भूस्खलनासारखी समस्या दूर करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
भूस्खलन होण्याला जेवढी नैसर्गिक कारणे आहेत, तितकंच मानवी हस्तक्षेपाचा वाटाही मोठा आहे. त्यामध्ये डोंगराळ क्षेत्रातील खोदकाम, खाण व्यवसाय, डोंगर उतारावरील जमिनीचे सपाटीकरण, रस्त्यांचा विस्तार, वणवा ही अशास्त्रीय कारणेही महत्त्वाची आहेत. यातील सर्वाधिक धोका हा वणव्यामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वणवा लागल्यामुळे जमिनीची अतिरिक्त धूप होऊन तो भूभाग उघडा बोडका होतो. त्यामुळे जमिनीत अतिरिक्त पाणी मुरते. प्रमाणापेक्षा जास्त पाणी जमिनीत मुरण्याने जमीन आतून सैल होते. सैल झालेला हा भाग पाण्याच्या दबावामुळे कोसळतो त्यालाच भूस्खलन असे म्हणतात.
पाऊस येणार आणि मग भूस्खलन होणार असं गृहीत धरण्यापेक्षा शासकीय यंत्रणांनी याची तयारी जानेवारी महिन्यापासूनच करणे आवश्यक आहे. जानेवारी ते मे या कालावधीत वणवे लागत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविले तर भविष्यातील भूस्खलनाचा होणारा त्रास टाळता येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
वणव्याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश व्हावा
वनक्षेत्रांसह डोंगराळ भागात लावले जाणारे वणवे निव्वळ पशूपक्ष्यांचे आश्रयस्थान उद्ध्वस्त करतात असं नाही. त्याच्या झळांनी आता माणसालाही होरपाळून टाकलं आहे. भूस्खलनाच्या मुळाशी वणव्याची धग असल्याने वणव्याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश होणे गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन विभागाने वन विभागाच्या बरोबरीने वणवा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे.
हे आहेत काही उपाय...!
वणवामुक्त गावांच्या संकल्पनेला प्रोत्साहन द्यावे
ग्रामस्वच्छता अभियानात वणवामुक्तीचा समावेश
वणवा प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये जलसंवर्धनाशी निगडित योजनांची अंमलबजावणी नको
वणवा लागणाऱ्या गावांवर महसुली दंडात्मक कारवाई
सलग तीन वर्षे वणवा लागलेल्या गावांना शासकीय योजनांचा लाभ नको
युवकांचा सहभाग घेऊन वणवा लागणार नाही यासाठी डोंगर दत्तक योजना राबविणे
कोट :
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ज्या पद्धतीने विविध अभियाने राबवून गावकऱ्यांचा त्यात सहभाग घेतला, त्याच पद्धतीने वणवामुक्तीसाठी कालबद्ध, कृतिबद्ध कार्यक्रम हाती घेणं महत्त्वाचं आहे. नाही तर भविष्यात मानवाला निसर्ग कोपाच्या विविध रूपांना सामोरे जावे लागेल.
- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा
पॉर्इंटर
कुठला विभाग काय करेल
पाटंबधारे : वणव्यामुळे जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता आणि जल प्रकल्पाची उपयुक्तता कमी होते. त्यामध्ये या विभागाने काम केले तर धरणे पूर्ण क्षमतेने वापरात येतील
कृषी :
निसर्गातील बहुतांश किडे, किटके यांना वनक्षेत्रात वणवे लागल्याने खायला शिल्लक राहत नाही, परिणामी ते पिकांवर येतात. या विभाागने शेतकऱ्यांना प्रबोधन करणे अपेक्षित आहे.
महसुली :
विविध विभागांच्या समन्वयाने वणवा प्रतिबंध आणि निर्मूलनासाठी आराखडा तयार करून वणवा प्रवण क्षेत्रांमध्ये त्याचा अवलंब करावा. गाववार वणवा दक्षता समितीची गरज
वनविभाग :
वणवाप्रवण क्षेत्रांमध्ये प्रतीवर्षी प्राधान्याने जाळरेषा काढणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून दोषींवर कडक कारवाई करणे
....................