प्रमोद सुकरे, कराड: ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्याशी निगडीत १० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी देखील झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या कारवाई संदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. यात अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतर ठिकाणची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
माजी मंत्री भास्कर जाधव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. "राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना छळण्याचे काम सुरु आहे. किरीट सोमय्या, मोहित कंबोज हे परप्रांतीय लोक फक्त मराठी नेते भ्रष्ट असल्याचा कांगावा करत असून याचा अनेकांना त्रास झाला आहे. त्यांची मालमत्ता जप्त करुन तसाच त्रास अनिल परबांना झाला आहे," असे मत शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव पाटण यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
माजी मंत्री भास्कर जाधव बुधवारी पाटण येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी माध्यमप्रतिनिधींनी विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम उपस्थित होते.