कोपर्डे हवेली : सध्या राज्यभर पशुसंवर्धन विभागाच्या पदविका कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू आहे. कराड तालुका पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन सादर केले. आयुक्त कार्यालय व वरिष्ठ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रलंबित मागण्यांबाबत दुय्यम वागणूक मिळत आहे.
कोरोना परिस्थितीत संरक्षण, रखडलेल्या पदोन्नती, वेतनातील त्रुटी, सुधारित अभ्यासक्रम, रिक्त पदे या कारणांमुळे १५ जूनपासून असहकार आंदोलन सुरू आहे. दि. २५ जूनपासून विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. राज्यभरातील सर्व निवेदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांना देण्यात येणार आहेत. यापुढील टप्प्यांत संपूर्ण काम बंद व अहवाल बंद आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पशुपालकांची गैरसोय होऊ नये व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी यासाठी हे आंदोलन टप्प्या-टप्प्याने तीव्र करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यासाठी डॉ. सतीश थोरवडे, डॉ. विलास पाटील, डॉ. अनिल घाडगे, डॉ. सुरेश पवार, डॉ. दीपक कापरे, डॉ. सतीश पाटील, डॉ. सुनील शिंदे हे उपस्थित होते.
कऱ्हाड : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना पशुसंवर्धन विभागाच्या आंदोलनाबाबत निवेदन देताना कराड तालुका संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.