तरडगाव : लोणंद येथे प्रत्येक गुरुवारी होणाऱ्या जनावरांच्या आठवडा बाजारास कोरोनामुळे सध्या बंदी घातल्याने व्यापाऱ्यांनी यावर नामी शक्कल काढली असून, ते आता लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव येथे रस्त्याकडेला आपली वाहने उभी करून व्यवहार करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून मोठी गर्दी होत आहे. यामुळे जनावरांच्या बाजारास ‘लोणंदमध्ये बंदी, रस्त्याकडेला मुभा,’ असे चित्र पाहावयास मिळत आहे.
लोणंद येथील जनावरांचा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे. दूरवरून व्यापारी या ठिकाणी येत असतात. खंडाळा व फलटण तालुक्यांतील विविध गावांचे नागरिक आपल्याकडील शेळी, बकरी, बोकडे विक्रीसाठी आणतात. प्रत्येक गुरुवारी लाखोंची उलाढाल बाजारात होते. मात्र, कोरोनामुळे सध्या या बाजारास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे व्यापारी रस्त्याकडेला ग्राहकाला थांबवून जनावरांचा व्यवहार करीत आहेत.
रस्त्याकडेला असल्याकारणाने पोलीस गाडी आली तरी तेथून लगेच पळ काढता येत आहे.
श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारीदेखील लोणंद-तरडगाव दरम्यान असलेल्या रस्त्याकडेला ठिकठिकाणी व्यापाऱ्यांच्या पिकअप गाड्या उभ्या दिसल्या. सकाळी साडेसहाच्या सुमारास व्यापारी हे रस्त्यावरून लोणंदकडे दुचाकीवरून बकरे घेऊन जाणाऱ्या नागरिकांना अडवून खरेदीसाठी पैशांची बोली करताना दिसत होते. सुमारे दोन तास परिसरात व्यापाऱ्यांच्या १५ ते २० पिकअप गाड्या व्यवहारासाठी थांबल्या होत्या. दरम्यान, मोठ्या रकमेची उलाढाल झाली, तर व्यवहार न जुळलेल्या काही व्यक्तींनी आपली जनावरे पुन्हा घरी नेली.
(चाैकट..)
प्रशासनाला गर्दी दिसत नाही का?
गेल्या तीन दिवसांपूर्वी तरडगाव हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गावातील व्यवहार सध्या बंद आहेत. मात्र, गावच्या हद्दीतच सकाळी रस्त्याकडेला जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी झालेली गर्दी पाहून प्रशासनाला हे दिसत नाही का, असा संतप्त सवाल करीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
१२तरडगाव
फोटो : लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव येथे रस्त्याकडेला अशा प्रकारे दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्याकडील जनावरांचा व्यवहार करताना व्यापारी दिसत होते.
(सचिन गायकवाड)