ऑन दि स्पॉट
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रात्रीच्या किर्रर अंधारात भैरोबाचा डोंगर पेटलेला अनेकांनी पाहिला; पण तो विझविण्यासाठी डझनभर पोरांनी जिवाचं रान केलं. पशुपक्ष्यांच्या आक्रोशात वनसंपदा जळून खाक होत होती, तर सरपटणारे जीव सैरभैर होऊन पळून पुन्हा आगीच्याच तावडीत सापडून राख होत होते. मनुष्याच्या छोट्याशा चेष्टेने शेकडो जीव या जाळाच्या भक्ष्यस्थानी गेले.
भैरोबाच्या पायथ्याला संध्याकाळी फिरायला आणि व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शेकडो डोळ्यांनी वणव्याची सुरुवात पाहिली, पण त्याला अटकाव करण्यासाठी कोणीही पुढं गेलं नाही. व्ही केअर ग्रुपमधील काही तरुणांनी ही आग शाहूपुरीत, तर काहींनी यवतेश्वर घाटातून पाहिली आणि त्यांनी भैरोबाच्या पायथ्याकडे धाव घेतली. सहाच्यासुमारास वणवा विझविण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मिळेल त्या हिरव्या फांद्यांनी ही आग नियंत्रणात आणली. पण आगीने रौद्ररूप धारण केलं आणि हिरव्या झाडांनीही पेट घेतला.
वणवा विझविण्याच्या प्रयत्नात डोंगरात वरपर्यंत गेलेल्या तरुणांना परतीचा मार्ग सापडत नव्हता. त्यांनी पर्यावरण अभ्यासक सुनील भोईटे यांना संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानंतर पाणी आणि खाऊचे साहित्य घेऊन साताऱ्यातून काहीजण भैरोबा पायथा आणि काहीजण यवतेश्वर माथ्यावर पोहोचले. अथक प्रयत्नानंतर मोबाईलच्या लाईटच्या आधारावर त्यांना परतीचा मार्ग दाखवून या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
कोट :
निसर्गचक्रात प्रत्येक घटक अमूल्य आहे. वणवा लावल्यानंतर तिथं होणारी जैविक आणि जीवित हानी न भरून येणारी आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले साप, घोरपड, सरडे, पक्षी यांना बघणं खेदजनक आहे. इथं आम्हाला त्रास झाला ज्वाळांमुळे, जखमाही झाल्या, पण वणवा विझवायला यापुढंही आम्ही धाऊ, हे नक्की.
- ओंकार ढाले, व्ही केअर ग्रुप
चौकट :
देवाची चूड वन्यजीवांसाठी घातक!
नव्याच्या पौर्णिमेला देव शिकारीला जातात. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी चूड केली जाते, अशी अख्यायिका आहे. मोठ्या काठीला गवत बांधून ते जाळून मंदिराला प्रदशिक्षणा घातली जाते. ही पेटती चूड विझवायची पध्दत नाही म्हणून ती ओढ्यात किंवा अन्य मोकळ्या जागेत टाकली जाते. त्यामुळे या दिवसांत वणवे लागण्याची संख्या अधिक असते.
सहा ते रात्री दीड वणव्याचा थरार
शाहूपुरी परिसरातील मुलांनी भैरोबाच्या पायथ्यापासून वणवा लागलेलं सायंकाळी ६ च्या सुमारास पाहिले. याची माहिती वनविभागाला देऊन तातडीने गाड्या काढून ही मुलं वनक्षेत्रात पोहोचली. हातात येईल त्या हिरव्या फांद्या घेऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण अंधार होईल तसं वाऱ्याच्या वेगाने ही आगही पसरत गेली. आग विझविण्याच्या प्रयत्नात ही मुलं जंगलात आतपर्यंत पोहोचली. सोबत नेलेले पाणीही आगीत गेल्याने तब्बल पाच तास ही मुलं पाण्याशिवाय वणव्याशी दोन हात करत होते.
वनविभागाचे कातडी बचाओ धोरण!
वणवा पेटल्यानंतर तिथं जाण्यापूर्वी मदतीसाठी गेलेल्या तरुणांनी वनविभागाला याची माहिती दिली होती. काही वेळाने वनविभागाचे काही कर्मचारीही तेथे पोहोचले, पण अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर विविध वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.
पॉईंटर
१२ आग विझविणारे
१ चक्कर येऊन कोसळला
४ जणांच्या हाताला ज्वाळांच्या जखमा
२ जणांच्या चप्पल, बुटांमधून विस्तव जाऊन जखम
या तरुणांनी घातला जीव धोक्यात
पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाबाबत संवेदनशील असलेल्या तरुणांनी मिळून व्ही केअर या ग्रुपची स्थापना जास्मीन अफगाण यांच्या नेतृत्वाखाली झाली. वणवा विझविण्यासाठी प्रेम अडागळे, ओंकार ढाले, उमेश काळे, मयूर अडागळे, प्रथमेश सोळस्कर, कुशल रोहिरा, संकेत काळे, ऋतुराज पवार, अथर्व कोडक यांनी प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर संपर्क ठेवून त्यांना जंगलातून बाहेर येण्यासाठी मार्ग दाखविण्याचे काम समीर चव्हाण आणि सुमित शिंदे यांनी केले.