म्हसवड : माण तालुक्यातील नागोबा यात्रा जनावरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असून सलग तीन वर्षाच्या दुष्काळानंतर प्रथमच या यात्रेत जनावरांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे या यात्रेत लाखो रुपयांची जनावरांची खरेदी विक्रीची उलाढाल होणार आहे.माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, म्हसवड नगर परिषद म्हसवड व नागोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची भव्य यात्रा दि. ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य महाराष्ट्रातुन येथे खिलारी बैल खरेदी करण्यासाठी शेतकरी येत असतात. या यात्रेत शेळ्या, मेंढ्या, जातीवंत खिलार बैल, दुभती जनावरे, मोठ्या प्रमाणावर विक्रीस आली आहेत. त्यामध्ये ४५० शेळ्या, ३५० मेंढ्या, ६ हजार ८४० बैल, ५४९ गाय, १४२० म्हैस, १४२ रेडे, १४१ संकरीत गाई इ. जनावरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अजून एक दोन दिवसात यात्रेत जनावरांची संख्या वाढणार आहे.या यात्रेत शेळ्या मेंढ्याचा बाजार, कुस्तीच्या जंगी फड, ओव्यांचा कार्यक्रम, जनावरांची निवड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेत मेवा, मिठाई, खेळणी, हॉटेल, बांगडी, बालगोपाळांसाठी पाळणे दाखल झाले असून जनावरांसाठी लागणारे दोर सजावट साहित्य, शेती उपयोगी अवजारे मोठ्या प्रमाणावर विक्रीस आले आहेत. परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या यात्रेत भाग घेतला. (प्रतिनिधी)
नागोबा यात्रेत जनावरांची आवक वाढली
By admin | Published: December 18, 2014 9:21 PM