कोळकी : सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असलेल्या पालखीतील वारकऱ्यांसाठी बनविलेले शिल्लक अन्न खाल्ल्याने चौदा बकऱ्या व नऊ शेळ्या अशी सुमारे २३ जनावरे दगावली आहेत. आणखी शेकडो जनावरे अत्यवस्थ अवस्थेत आहेत.कोळकी येथील शारदानगर येथे किसन पांगरू दडस (रा. दुधेबावी, ता. फलटण) हे दीड महिन्यापासून पाल ठोकून ६५ जनावरांसह राहत आहेत. तसेच सजाबाई मारुती कोकरे (रा. तिरकवाडी, ता. फलटण) या ६० शेळ्यांसमवेत पाल ठोकून राहत आहेत. त्यांनी काल, गुरुवारी शारदानगर व वनदेवशेरी परिसरात मेंढ्या व शेळ्या चरायला नेल्या होत्या. त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी बनवलेले शिल्लक अन्न उघड्यावर टाकले होते. जनावरांनी ते अन्न दिवसभर खाल्ल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास जनावरांना पाणी पाजल्यानंतर अचानकपणे जनावारांचे पोट फुगणे, रवंथ न करणे, चालता न येणे अन् उभे राहिल्यानंतर खाली पडणे, अशी लक्षणे दिसू लागली. यामुळे भयभीत झालेल्या दडस यांनी हा प्रकार नातेवाइकांनी दूरध्वनीवरून कळविला. जनावरांच्या खासगी डॉक्टरांच्या उपचारास प्रतिसाद न देता अनेक जनावरांनी जागीच माना टाकल्या. त्यामध्ये किसन दडस यांच्या चौदा बकऱ्या, तर सजाबाई कोकरे यांच्या सहा शेळ्या, तीन करडांचा मृत्यू झाला. पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले. त्यांनी रात्रभर जनावरांवर औषधोपचार केल्याने काही जनावरे वाचली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)
वारकऱ्यांचे शिळे अन्न खाल्याने २३ जनावरे दगावली
By admin | Published: July 05, 2014 12:17 AM