सातारा : बुद्ध, चार्वाक, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, इत्यादी महापुरुषांचे विचार मांडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच महापुरुषांचा वारसा पुढे नेत आहे, असे मत ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते अण्णा कडलास्कर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे नवीन कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण हेतूने राज्यव्यापी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अंनिस कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पार्श्वभूमी आणि गेल्या ३२ वर्षांपासूनची समितीची कारकीर्द आणि यशस्वी घोडदौड आपल्या विस्तृत मांडणीतून प्रशिक्षणार्थींसमोर सादर केली.
या दीर्घ प्रवासात आलेल्या असंख्य अडचणींचा आणि कठीण प्रसंगांचा उल्लेखही त्यांनी आपल्या विषयाच्या मांडणीत केला. तसेच विज्ञान, निर्भयता, नीती या तत्वांचे महत्त्व सांगितले.
मुक्ता दाभोलकर यांनी नवीन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ‘अंनिस’ची चतूर्सुत्री उदाहरणासह समजावून सांगितली. जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा याबाबतही माहिती दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवत असलेले विविध उपक्रम या चतूर्सुत्रीभोवती कसे गुंफलेले आहेत, हेही त्यांनी समजावून सांगितले.
हमीद दाभोलकर आणि मिलिंद देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात नवीन कार्यकर्त्यांच्या मनाला पडणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहसापेक्षा आपुलकीची जास्त गरज असते, असेही ते म्हणाले. तर मिलिंद देशमुख यांनी खगोलशास्त्रीय माहिती देताना फलज्योतिष हे शास्त्र नाही आणि ग्रह, ताऱ्यांचा मानवी जीवनावर अजिबात परिणाम होत नाही, हे प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
एकूण १२८ शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर सर्व नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जोडून घेण्यासाठी उत्साहवर्धक असे ठरले. राजीव देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानत शिबिराचा समारोप केला.