लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील वनवासवाडी येथील काळेश्वरी देवी मंदिर परिसरात करणी व जादूटोणा यांची भीती घालून पशुहत्येची तयारी सुरू असून प्रशासनाने ही पशुहत्या थांबवावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेली आहे.
अंनिसतर्फे देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृष्णानगर (वनवासवाडी) येथील काळूबाई मंदिर परिसरात भरल्या जाणाऱ्या यात्रेच्या ठिकाणी दि. ३ मार्च रोजी पहाटेपासून श्री काळेश्वरी देवी मंदिरासमोर व परिसरात उघड्यावर हजारो जिवंत कोंबड्या बकऱ्यांची अंधश्रद्धेपोटी पशुहत्या करण्याची तयारी केली गेली आहे.
सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र यात्रा-जत्रा यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणलेले आहेत. या नियमांचे उघडपणे उल्लंघन करून श्री काळेश्वरी देवी मंदिर परिसर नाईक वीटभट्टी मागे कृष्णानगर, वनवासवाडी सातारा या ठिकाणी २२ फेब्रुवारी रोजी गुप्त बैठक घेण्यात आली. दि. २ व ३ मार्च रोजी मोठी यात्रा घेण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मिळालेली आहे. दिनांक तीन मार्च रोजी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात बकरे व कोंबडी यांचे बळी श्री काळेश्वरी देवी मंदिर परिसरात दिले जाणार आहेत. यासाठी भक्तांना मोठ्या प्रमाणात जेवणावळी दिले जाणार आहेत. ते पशुबळी विधी करण्यासाठी सुरी, सत्तूर, विळे, लाकडी ठोकळे, भांडी यांची जय्यत तयारी मंदिरामागे असलेल्या एका बंगल्याच्या परिसरात करण्यात आलेली आहे. येणाऱ्या भक्तांना यात्रेत करणी, जादूटोणा झाल्याची मानसिक भीती घालून त्यावर उपाय करण्यासाठी बकरे,कोंबड्यांचे बळी देण्यास प्रवृत्त केले जाते. अशा प्रकारे देवीचा नवस फेडण्यासाठी करणी घालवण्यासाठी उघड्यावर दिले जाणारे पशुबळी उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ यामध्ये लक्ष घालून तीन मार्च रोजी होणारी पशुहत्या थांबवावी असे त्यांनी म्हटले आहे. अंनिसतर्फे देण्यात आलेल्या पत्रकावर डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, हौसेराव धुमाळ त्यांच्या सह्या आहेत.
चौकट
भारतीय संविधानाने देव आणि धर्म पालनाचे स्वातंत्र्य सर्व नागरिकांना दिले आहे. याचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदर करते; परंतु देव आणि धर्माच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी करणी व जादूटोणा यांची भीती घालून पशुबळी करायला लावणे याला विरोध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांमध्ये मांढर गडावर मोठ्या प्रमाणावर पशुहत्या होत होती. तेथे घडलेल्या मोठ्या दुर्घटनेमुळे अनेकांचे जीव गेले होते. याबाबत देखील अंनिसने स्पष्टीकरण केलेले आहे.
कोट