सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली सातारा पालिका हद्दवाढीच्या घोषणेसाठी तारीख पे तारीख होत आहे. मात्र आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हद्दवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीची गणिते हद्दवाढीवरच अवलंबून असल्याने सातारकरांची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.गेल्या दोन वर्षांपासून सातारची हद्दवाढ चर्चेत आहे. जस-जसी पालिकेची निवडणूक जवळ येत आहे, तश-तशा राजकीय वर्तुळात हद्दवाढीच्या चर्चा झडू लागल्या आहेत. हद्दवाढीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फाईल स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आली आहे. नवीन प्रस्तावानुसार जकातवाडी, खेड, शाहूपुरी, संभाजीनगर, विलासपूर, गोडोली, शाहूनगर, बोगदा परिसर, मोळाचा ओढा हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे.दरम्यान, हद्दवाढीनंतर सुमारे एक लाख लोकसंख्या वाढणार असून पालिकेला त्यांच्याकडून महसुल जमा होईपर्यंत सुविधा द्याव्या लागणार आहेत. हद्दवाढ अचानक झाल्यानंतर पालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच पालिकेला निधीची तरतुद करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)नव्या उमेदवारांची फिल्डिंग शहराची हद्दवाढीचा प्रस्तावाची चर्चा सुरू असतानाच अनेकांनी विरोधही केला. परंतु खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काहीही झालं तरी सातारची हद्दवाढ होणारच, असे छातीठोकपणे सांगितले होते. त्यामुळे फारसा विरोध झाला नाही. परंतु आता ही हद्दवाढ अटळ असल्याने नव्या नेत्यांची गणीते आत्तापासूनच सुरू झाली आहेत. आगामी पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी मिळण्यासाठी दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे फिल्डिंग लावली जात असल्याचे बोलले जात आहे.हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर लगेच हद्दवाढीला हिरवा कंदील मिळणार आहे. हद्दवाढीत समाविष्ठ झालेल्या भागाचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधीची तरतुदही होणार आहे.- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका
हद्दवाढीची घोषणा.. तारीख पे तारीख !
By admin | Published: May 08, 2016 9:29 PM