फलटण (जि. सातारा) : माढा लोकसभा मतदारसंघातून मागील वेळी खासदार निवडून देताना जी चूक केली ती यावेळी करू नका, अन्यथा पुढील पिढ्यांचे राजकारण अडचणीत येईल. माढ्यामधून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी डावलण्याचा प्रकार झाला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही उमेदवारी मिळू देणार नाही, असे वक्तव्य विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अत्यंत अहंकारी, गर्विष्ठ माणूस असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. या टीकेमुळे माढा मतदारसंघातील राजकारण तापले असून राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
फलटण येथे माढा मतदारसंघातील खासदार पदाच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरेंद्र गुंदगे, बाळासाहेब सोळस्कर यांच्यासह फलटण, माण-खटाव तालुक्यातील लोकांची उपस्थिती होती.रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, खासदार रणजितसिंह यांचे आणि माझे वैयक्तिक काही देणे घेणे नाही. अत्यंत अहंकारी, गर्विष्ठ माणूस परत निवडून देणार असाल तर तुमचा दिगंबर आगवणे झाल्याशिवाय राहणार नाही. हे लोक नरेंद्र मोदींच्या आणि भाजपच्या नावावर मते घेतात. यांचे स्वत:चे कर्तृत्व शून्य आहे. एक सांगलीच्या तुरुंगातून बाहेर येऊन आमदार झाला आणि दुसरा फलटणच्या बाहेर माहीत नसलेला दिल्ली बघायला गेला. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
कडू गोळी नव्हे, यांचे तोंडच कडूकाही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण दौरा झाला. या दौऱ्यामध्ये फडणवीस यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. त्यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ही भेट आमच्यासाठी कडू गोळीसारखी आहे तरी आम्ही ती सहन करतो, असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना रामराजेंनी कडू गोळी नव्हे तर यांचे तोंडच कडू असल्याचा पलटवार केला आहे.