सातारा : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची लाट ओसरत असतानाच पुन्हा अचानक कोरोनाची रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला तर ८७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने वाढत आहे. हा मृत्यूदर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे; पण यात प्रशासनाला यश येत नाही.
सातारा जिल्ह्यात गत दीड वर्षांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी अधिक होत आहे; पण मृतांची संख्या मात्र कमी होण्याऐवजी वाढतच आहे. लाॅकडाऊन करूनही प्रशासनाने पाहिले; परंतु यातही फारसा काही फरक पडला नाही. सातारा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी झाली. एवढेच नव्हे तर मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरातही कोरोना आटोक्यात आलाय; पण सातारा शहरासह जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येइना. जिल्हा प्रशासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही मोहिमही राबविली. तसेच कोरोना चाचण्याही वाढवल्या; पण काहीच फरक पडला नाही. सरतेशेवटी प्रशासनाने लाॅकडाऊनचे हत्यार उपासले. तरीसुद्धा रुग्ण संख्या काही कमी होत नाही. सर्व जनतेवर सोडून प्रशासन नामानिराळे राहतेय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय.
दरम्यान, मंगळवारी कोरोना बाधितांचे अहवाल आले. यामध्ये जावलीळी ३९, कऱ्हाड २१२, खंडाळा २७, खटाव ७५, कोरेगाव ९३, माण ७८, महाबळेश्वर ११, पाटण २४, फलटण ११६, सातारा १५१, वाई ३७ व इतर ११ जणांचा समावेश आहे.
त्याचबरोबर मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी १, कऱ्हाड ७, खंडाळा ०, खटाव ०, कोरेगाव १, माण १, महाबळेश्वर ०, पाटण २, फलटण ७, सातारा ५, वाई २ जणांचा समावेश आहे.