सातारा : राज्यात खळबळ उडवून देणाºया मांढरदेव येथे झालेल्या विषप्रयोग प्रकरणातील आणखी एकाचा रविवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई नारायण चव्हाण (वय ६५, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
कौटुंबिक कलहातून आपल्याच कुटुंबातील पाच जणांना देवाचे तीर्थ म्हणून विष देण्याचा प्रकार वाई जवळील मांढरदेव येथे २६ जुलै रोजी घडला होता. त्यावेळी स्वप्निल विष्णू चव्हाण (वय २३) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाई पोलिसांनी विष्णू नारायण चव्हाण (रा. बारामती) याला २७ जुलै रोजीच अटक केली आहे. तो सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
विष्णू याने कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडचणीमुळे कुटुंबातील आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली यांना विष दिले होते. त्याच्या दोन मुलींवर सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परंतु विष्णू चव्हाण याची पत्नीवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मांढरदेव प्रकरणामध्ये स्वप्नील चव्हाण याचा अगोदरच मृत्यू झाल्यामुळे चव्हाण कुटुंबिय दु:खातून सावरत असतानाच रविवारी स्वप्नीलच्या आजीचाही मृत्यू झाला.